नांदेडमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (सीएए) निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी उपस्थित राहत मुस्लिम समाजाला मार्गदर्शन केले. याचा एक व्हिडिओ अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. त्यात नागरिकत्व कायदा कोणत्याही स्थितीत महाराष्ट्रात लागू होणार नाही, अशी खात्री त्यांनी उपस्थितांना दिली आहे.
महाराष्ट्रात आता आमचे सरकार आहे. भाजपचे संकट आणखी पाच वर्षे महाराष्ट्रावर नको म्हणून आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेसला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी व्हावे लागेल, असे पक्षात सर्वांचे मत बनले. त्यातच अनेक मुस्लिम बांधवांनीही तसा आग्रह आमच्याकडे धरला. तो आग्रह मान्य करून आम्ही राज्यातील सरकारमध्ये सहभागी झालो. आता आमचे सरकार महाराष्ट्रात असल्याने तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. हे सरकार असेपर्यंत महाराष्ट्रात सीएए लागू होणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
संविधानाचा उल्लेख करत अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आहे आणि त्याविरुद्ध कोणतेही सरकार जाऊ शकत नाही, असे चव्हाण यांनी ठणकावले. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि ही ओळख आणखी भक्कम करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असेही चव्हाण पुढे म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times