विषाणूचा कहर आणि त्यातच पोलिस दलातील वाढता संसर्ग पाहून दलातील ५५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या पोलिसांना कामावर गैरहजर राहण्याची दिलेली सवलत आता दिवाळीनंतर बंद होण्याची शक्यता आहे. अनलॉकमध्ये शिथिलता, त्यामुळे उसळणारी गर्दी आणि करोनाबाधित झाल्याने पोलिसांनी अनुपस्थिती यामुळे पोलिस दलावर येणारा ताण पाहता या पोलिसांना पुन्हा कामावर हजर करण्याबाबत चाचपणी सुरू आहे.
मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून पोलिस यंत्रणा अहोरात्र राबत आहे. लॉकडाउन कालावधीत नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असल्याने पोलिसांचा नागरिकांशी थेट संबंध आला. नाकाबंदी, गस्त, बंदोबस्तामुळे लोकांमध्ये जावे लागल्याने आपत्कालीन यंत्रणेत करोनाचा सर्वाधिक फटका पोलिस दलाला बसला. राज्यामध्ये सुमारे २७ हजाांहून अधिक पोलिसांना करोनाची लागण झाली. तर २९० पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यामध्ये मुंबई पोलिस दलात बाधितांची आणि मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या अधिक असून, यामध्ये ५५ वर्षांपेक्षा अधिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यांसंबधी आजार असलेल्या पोलिसांचा समावेश आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी मुंबई पोलिस दलातील ५५पेक्षा अधिक वयाच्या तसेच ५२पेक्षा अधिक वय आणि मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार असलेल्या पोलिसांना सुट्टी देण्यात आली. मार्चपासून हे पोलिस सुट्टीवर आहेत.
करोनाचे संकट कायम असले तरी लॉकडाउन शिथिल केल्यामुळे मुंबईतील जवळपास सर्वच व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होत आहे. गुन्हे नियंत्रण तसेच कायदा आणि सुव्यस्था टिकविण्याचे मोठे आव्हान असल्याने पोलिसांवर ताण येत आहे. त्यातच करोनाची लागण झालेले बरेच पोलिस अद्याप कर्तव्यावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे १७ नोव्हेंबरपासून ५५ वर्षांवरील पोलिसांना पुन्हा कर्तव्यावर हजर करण्याविषयी पोलिस दलात हालचाली सुरू आहेत. काही पोलिस ठाण्यात ५५ वर्षांवरील पोलिस स्वतःहून कर्तव्यावर हजर झाले आहेत. तर, दिवाळीनंतर सर्वच पोलिस कामावर दिसतील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
हलके काम देणार
५५ वर्षांवरील पोलिसांची वैद्यकीय तपासणी, मानसिक तयारी अभ्यासण्यात येईल. हे पोलिस नागरिकांच्या संपर्कात येणार नाहीत, तसेच त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होणार नाही, असे हलके काम त्यांना देण्यात येईल. १२ तास ड्युटी देऊन पुढे ४८ तास त्यांना सुट्टी देण्यात येणार आहे. सशस्त्र दलामध्ये याबाबत तयारी सुरू असतानाच पोलिस ठाणे पातळीवरही सुट्टीवरील पोलिसांशी संपर्क साधून सध्याच्या परिस्थितीत त्यांची काम करण्याची मानसिकता आहे का, हे तपासले जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times