नवी दिल्ली: भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे अभिनंदन करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांना जनतेनं नाकारलं आहे आणि आता तेच खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत, असं मोदी म्हणाले. निवडणुकीत जनतेनं ज्यांना नाकारलं, त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्रे उरली आहेत, असंही ते म्हणाले.

भाजपच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर जगत प्रकाश नड्डा यांचं दिल्लीच्या पक्ष कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे माजी अध्यक्ष अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज नेते त्यांच्या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी भाषणात नड्डा यांचे अभिनंदन करतानाच, विरोधकांवर तोफ डागली.

काय म्हणाले मोदी?

विरोधकांना देशातील जनतेनं नाकारलं आहे. आता ते खोटं बोलत आहेत, अफवा पसरवत आहेत.

लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. सक्रिय राहण्याची गरज आहे. नाकारलेले लोक अफवा पसरवत आहेत. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आता राहिला नाही. ते खोटं बोलत राहतील आणि आम्ही पुढे जात राहू.

ही जनताच आमची खरी शक्ती आहे. याच शक्तीनं पहिल्यांदाच एखाद्या बिगर काँग्रेस पक्षाला बहुमत दिलं आणि त्यानंतर दुसऱ्यांदा मोठ्या बहुमतानं निवडून दिलं.

निवडणुकांमध्ये जनतेनं ज्यांना नाकारलं, त्यांच्याकडे आता खूप कमी शस्त्रे उरली आहेत. त्यात खोटं बोलणं आणि अफवा पसरवणं ही दोन शस्त्रे आहेत. हे आतापर्यंत बघत आलो आहोत.

हिमाचलच्या लोकांना वाटत असेल की हिमाचलचा सुपुत्र आज अध्यक्ष झाला आहे. पण नड्डांवर जेवढा अधिकार हिमाचलचा आहे, तितकाच अधिकार बिहारचाही आहे. त्यांचं शिक्षण बिहारमध्ये झालं आहे. यावेळी बिहारला त्यांचा जास्त अभिमान वाटला असेल. माझ्या आयुष्यातील सर्वात ऊर्जा देणारे दिवस हिमाचलमधील होते.

मला खूप काळ हिमाचलमध्ये काम करता आलं. मी जेव्हा पक्षाचं काम करत होतो, त्यावेळी नड्डा हे युवा मोर्चाचे काम करत होते.

ज्या आशा आणि अपेक्षांसह पक्ष स्थापन झाला आहे, त्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही.

सत्तेत असताना संघर्ष करणं एखाद्या राजकीय पक्षासाठी खूप कठीण असतं. पण भाजप सत्तेत असताना अमित शहा यांनी पक्ष वाढवला. ही खूप मोठी गोष्ट आहे.

मी खूपच भाग्यवान आहे. इथे बसलेल्या सर्व नेत्यांसोबत काम करायला मिळालं. त्यांचे बोट पकडून शिकायला मिळालं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here