वाचा:
मधुसुदन गोविंद नायर (४२), उषा मधुसुदन नायर (४०), आदित्य मधुसुदन नायर (२३), (सर्व राहणार वाशी, ), साजन एस. नायर (३५), आरव साजन नायर (वय ३, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत तर रिंकू साजन गुप्ता (३०), दिव्य मोहन (३०), सिजीश शिवसदन (२८), दीपा नायर (३२), दिप्ती मोहन (२८), लीला मोहन (३५), अर्चना नायर (२५) हे सर्वजण जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही मिनीबस वाशीवरून गोव्याकडे निघाली होती. पहाटे पाचच्या सुमारास अचानक बसवरील चालकाचे नियंत्रण सुटून बस सुमारे ५० फूट खोल असणाऱ्या तारळी नदीच्या पात्रात कोसळली. सर्व प्रवासी यावेळी झोपेत असल्याने नक्की काय घडले?, याचा क्षणभर कोणालाच अंदाज आला नाही. पुलानजीकच्या मोकळ्या भागात बस कोसळून मोठा आवाज झाल्याने जवळपासचे नागरिक मदतीसाठी धावले. घटनेनंतर अवघ्या तासाभरात उंब्रज पोलीस व महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्याने तत्काळ मदतकार्य सुरू झाले.
वाचा:
एका प्रवाशाने मारली उडी
उंब्रज (ता. कराड) येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस खाली कोसळली. यातील एका प्रवाशाने बाहेर उडी मारत स्वत:चे प्राण वाचवले. उडी मारल्याने हा प्रवासी जखमी झाला पण त्या स्थितीतही त्याने पोलीस आणि स्थानिक नागरिकांना माहिती देण्यासाठी धडपड केली. त्यानंतर नागरिक व पोलिसांनी येथे धाव घेवून मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या आठ जणांना तत्काळ कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात नक्की कसा झाला?, याची माहिती उंब्रज पोलीस घेत आहेत.
पिकनिक बेतली जीवावर
मिनीबसमधून प्रवास करणारे सर्व ११ जण एकमेकांचे नातेवाईक होते. दिवाळीची सुट्टी असल्याने ते गोव्यात पिकनिकसाठी चालले होते. शुक्रवारी रात्री ९ वाजता ही बस नवी मुंबईतून निघाली. त्यानंतर खोपोली येथे बस जेवणासाठी थांबली आणि नंतर पुढचा प्रवास सुरू झाला. दरम्यान, ही बस तारळी नदीपुलावर असतानाच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि अपघात घडला. याप्रकरणी उंब्रज पोलिसांनी चालक गुप्ता याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times