मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात पुरेशी जागा नसल्याने यांचा पुतळा उभारण्यास प्रशासनाने नकार दिला आहे. पुतळा उभारायचाच असेल तर व अन्य समिती सभागृहात उभारण्यात यावा, असा पर्याय सुचवला आहे. समित्यांच्या सभागृहात आतापर्यंत कोणत्याच नेत्याचा पुतळा उभारण्यात न आल्यामुळे वाजपेयी यांच्या पुतळ्याची मागणी कागदावरच राहणार आहे.
पालिकेच्या ब्रिटिशकालीन ऐतिहासिक हेरिटेज सभागृहात महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, इंदिरा गांधी, सरदार वल्लभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, दादाभाई नवरोजी, डोसाभाई कराका, रावसाहेब विश्वनाथ मंडलिक, सर भालचंद्र भाटवडेकर यांचे पुतळे आहे. याशिवाय विविध मान्यवरांची ११ तैलचित्र होती. सन २००० मध्ये पालिका सभागृहाला लागलेल्या आगीत यातील नऊ चित्रे आगीमध्ये जळून खाक झाली. ही नष्ट झालेली तैलचित्रे आता नव्याने बनवण्यात येत आहेत.
जानेवारी २०१७ मध्ये पालिका सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात आले. याच धर्तीवर सभागृहात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा उभारण्यात यावा, असा ठराव भाजपच्या दक्षा पटेल यांनी मांडला होता. २०१८मध्ये या ठरावाला पालिका सभागृहात मंजुरी मिळाली आहे. याबाबत पालिका प्रशासनाने आपला अभिप्राय दिला असून त्यात जागेची अडचण असल्यामुळे पुतळा उभारण्यास नकार दिला आहे.
पर्यायांचा विचार
पालिका सभागृहात नगरसेवक यांच्यासह अधिकारी व पत्रकारांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. अनेक अधिकाऱ्यांना सभागृहात उभे राहावे लागत आहे. सभागृहात नवीन पुतळा लावल्यास नगरसेवक व अधिकाऱ्यांना जागा अपुरी पडू शकते. सभागृहात पुतळे व तैलचित्र लावण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे यापुढे सभागृहात कोणत्याच महापुरुषाचा पुतळा लागणार नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यावर पर्याय म्हणून प्रशासनाने स्थायी समिती व अन्य समिती सभागृहात पुतळा उभारणे अथवा तैलचित्रे लावणे उचित ठरेल, असा अभिप्राय दिला आहे. त्यामुळे वाजपेयी यांच्या पुतळ्याला भाजपची संमती असेल तर समिती सभागृहांमध्ये उभारणे शक्य असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र यासाठी अन्य पक्षाच्या नगरसेवकांचीही संमती लागणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times