वाचा:
राज्यामध्ये करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यासोबतच सर्व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. आता राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, शनिवारी तसे जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिर्डी येथील साई मंदिर भाविकांसाठी उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या, पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर उघडल्यानंतर प्राधान्याने शिर्डी येथील ग्रामस्थांना टप्याटप्याने दर्शन देण्यात येणार आहे. मात्र, यावेळी गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनासाठी टोकन दिले जाणार आहे. तर, शिर्डीबाहेरील भाविकांना ऑनलाइन पद्धतीने पास काढून दर्शनासाठी यावे लागणार आहे.
दहा वर्षाच्या आतील मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनाची परवानगी नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे.
अर्थकारणाची घडी येणार रुळावर
शिर्डी येथे श्रीसाई बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. मात्र, १७ मार्चपासून मंदिर बंद असल्यामुळे येथील अर्थकारणाची घडी संपूर्ण विस्कटली होती. छोटमोठ्या व्यवसायावर अवलंबुन असणाऱ्या अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मंदिर उघडण्यास केव्हा परवानगी मिळेल, याकडे भाविकांसह या भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. आता पाडव्यापासून मंदिर उघडण्यात येणार असल्यामुळे येथील अर्थकारणाची घडी रुळावर येण्यास हळूहळू सुरुवात होणार आहे
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times