सांगली: अतिवृष्टीमुळे यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत चार टीएमसी जादा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विशेषतः दुष्काळी तालुक्यांमधील बहुतांश तलाव आणि बंधारे भरल्याने पाणी टंचाईच्या झळा कमी होणार आहेत. याशिवाय शेतीसाठीही पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि मिरज तालुके वगळता अन्य तालुक्यांना नेहमीच दुष्काळाचा सामना करावा लागतो. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, तासगाव आणि कडेपूर तालुक्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असते. उन्हाळ्यात पाण्याचे टँकर आणि चारा छावण्यांसाठी सरकारला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. दुष्काळामुळे हजारो कुटुंबांना स्थलांतर करावे लागते. यंदा मात्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दुष्काळी भाग पाणीदार बनला आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील ७९ लघु व ५ मध्यम प्रकल्पांमध्ये ५७९६ दशलक्ष घनफूट म्हणजेच पावणेसहा टीएमसी पाणीसाठा होता. यंदा जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे तलाव आणि बंधा-यांमध्ये ९४४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जवळपास चार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे दुष्काळी भागातील टंचाईच्या झळा कमी होणार आहेत.

वाचा:

पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांनी यंदा पहिल्यांदाच म्हैसाळ आणि टेंभू उपसा योजनांद्वारे कृष्णेच्या पुराचे पाणी दुष्काळी भागात पोहोचवले. ऑगस्ट महिन्यात दीड टीएमसी पाणी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, विटा, खानापूर यासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यात पोहोचले. म्हैसाळ योजनेद्वारे २० मोठे आणि छोटे ३० तलाव भरले. टेंभू योजनेतून २० मोठे आणि २५ छोटे तलाव भरले. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांश तलाव भरून ओसंडून वाहू लागले. गेल्या १५ ते २० वर्षात कधीच न भरलेले अनेक तलाव यंदा ओव्हरफ्लो झाल्याने शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. वाढलेल्या पाणीसाठ्यातील ६० टक्के पाणी पिण्यासाठी आरक्षित ठेवले जाईल. उर्वरित पाण्याचा शेतीसाठी वापर करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या आहेत.

२०१९ मधील पाणीसाठा

मध्यम व लघु प्रकल्प – ८४
एकूण पाणीसाठा – ५७९६ दलघफू
उपयुक्त पाणीसाठा – ७३ टक्के

२०२० मधील पाणीसाठा
मध्यम व लघु प्रकल्प – ८४
एकूण पाणीसाठा – ९४४० दलघफू
उपयुक्त पाणीसाठा – ८९ टक्के

दुष्काळी भागात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस
आटपाडी तालुक्यात सरासरी ३५० मिमी पाऊस पडतो. यावेळी तब्बल ७३० मिमी पावसाची नोंद झाली. जत, खानापूर-विटा आणि कवठेमहांकाळ तालुक्यांमध्येही सरासरीपेक्षा जवळपास दुप्पट पाऊस झाल्याने भूजल पातळीत वाढ झाली आहे. जमिनीवरील पाण्यासह जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याने दुष्काळी पट्टा सुखावला आहे.

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here