दिवाळीच्या निमित्ताने पहिल्यांदाच गृहमंत्री गडचिरोली इथे येत असल्याने पोलीसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलीसांशी संवाद साधला असून त्यांच्यासोबत फराळही केला. नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पोलीसांच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. तसंच, त्यांच्या घरांना भेटी देत कुटुंबियांशी संवाद साधत लहान मुलांसमवेत गप्पा गोष्टी केल्या. या भागामध्ये दौंड आणि कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकड्या कार्यरत आहेत. त्यांचे गृहमंत्र्यांनी विशेष कौतुक केले.
‘भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या दिवाळीचा आनंददायी सण कुटुंब व मित्रांसोबत साजरा करायला मिळत नाही. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात पोलीस घरापसून, आपल्या आई-वडलांपासून, भावंडांपासून, पत्नी-मुलाबाळापासून दूर असाल, याची मला जाणीव आहे. तेव्हा पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख म्हणून मला मनापासून वाटलं की मी तुमच्यात यायला हवं. माझं पोलिस दल ड्युटीवर असताना मी माझ्या घरात, माझ्या पत्नी-मुलांसमवेत दिवाळी साजरी करत बसलो असतो तर माझ्या मनाला रुखरुख लागली असती. म्हणून ठरवलं की तुमच्याकडं यायचं आणि काही वेळ तरी तुमच्या सोबत घालवायचा, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्र्यांच्या भेटीने पोलीस कर्मचारी भारावले
गडचिरोलीतील अत्यंत दुर्गम आणि टेकड्यांचा प्रदेश असलेल्या पातागुडम येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या ऐतिहासिक भेटीने पोलीस कर्मचारी भारावून गेले. येथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांची देशमुख यांनी आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गडचिरोली पोलीस मुख्यालयापासून तीनशे किलोमीटर अंतरावर छत्तीसगढ सीमेलगत इंद्रावती नदीकाठी पातागुडम पोलीस चौकी आहे. देशातील सर्वात दुर्गम चौकी मानली जाते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times