निवड समितीमध्ये सध्याच्या घडीला तीन पदे रिक्त आहेत. त्यासाठी बीसीसीआयने अर्जही मागवले आहेत. निवड समिती सदस्य पदासाठी आता भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने अर्ज केल्याचे समजते आहे. आगरकरबरोबर माजी क्रिकेटपटू मणिंदर सिंग आणि एस. एस. दास यांनीही अर्ज केल्याचे म्हटले जात आहे.
सध्याच्या घडीला निवड समितीमध्ये सुनील जोशी आणि हरविंदर सिंग हे दोन माजी क्रिकेटपटू आहे. या समितीचे अध्यक्षपद सुनील जोशी यांच्याकडे आहे. पण निवड समितीमध्ये अजून काही सदस्यांची पदे रीक्त आहेत. यासाठी बीसीसाआयने माजी क्रिकेटपटूंकडून अर्ज मागवले आहेत. त्यानुसार आगरकर, मणिंदर आणि दास यांनी अर्ज केल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्माही या शर्यतीमध्ये आहेत, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता आगामी निवड समितीमध्ये नेमकी कोणाला संधी मिळते आणि त्यानंतर संघ निवडीमध्ये काही बदल होतो का, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
आगरकर आणि मणिंदर यांनी गेल्यावेळीही निवड समितीमधील पदासाठी अर्ज केला होता. त्यावेळी या दोघांचा विचार करण्यात आला नव्हता. पण या दोघांनी यावर्षी पुन्हा एकदा अर्ज केल्याचे समजत आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही आगरकरने अर्ज केल्याचे खासगीत सांगितल्याचे समजत आहे. पण जोपर्यंत बीसीसीआय याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडत नाही, तोपर्यंत या गोष्टी स्पष्ट होणार नाहीत. त्यामुळे बीसीसीआय या गोष्टीवर आता कधी पहिले वक्तव्य करते आणि माहिती देते, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times