म. टा. विशेष प्रतिनिधी, उस्मानाबादः करोना परिस्थितीमुळे गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवी राज्य सरकारच्या निर्णयानंतर सोमवार १६ नोव्हेंबरपासून दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. सरकारच्या नियम व अटींनुसार मंदिरात दररोज चार हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना प्रवेश पास, मास्क, सुरक्षित वावर नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. श्री प्रशासनाने याबाबत नियम व अटी जाहीर केल्या आहेत.

करोना परिस्थितीमुळे राज्यातील धार्मिकस्थळे २६ मार्च २०२० पासून बंद आहेत. राज्य सरकारने १४ नोव्हेंबर रोजी आदेश काढून १६ नोव्हेंबरपासून धार्मिकस्थळे उघडण्यास नियम व अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी देवींचे मंदिर सोमवारी दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे.

वाचाः

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या सूचनेनुसार सोमवारपासून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

वाचाः

मंदिर प्रवेश पास www.shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. ऑफलाइन पासेससाठी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय, नळदुर्ग रोड, तुळजापूर, १०८ भक्त निवास घाटशीळ परिसर, जुने बसस्थानक तुळजापूर व मंदिर प्रशासकीय इमारत, तळमजला येथे सोय करुन देण्यात आली आहे.

वाचाः

हे असणार नियम

सशुल्क दर्शनाचे पास मंदिराच्या प्रशासकीय इमारतीत तळमजल्यावर मिळतील.

श्री देवीजींची नित्योपचार पूजा सध्या सुरु आहे त्याप्रमाणेच होईल. दोन्ही वेळेस एकच अभिषेक पूजा घालण्यात येईल.

अन्य भाविकांची अभिषेक पूजा, सिंहासन पूजा, गोंधळ, जावळ, गाभाऱ्यात ओटीभरण या पूजा स्थगित असतील.

श्री देवीजींच्या मूळ गाभाऱ्यात कोणत्याही भाविकास प्रवेश नसेल

मंदिर प्रवेशाच्या वेळी भाविकाचे तापमान, ऑक्सिजन तपासले जाईल. ६५ वर्षांवरील वृद्ध, गरोदर स्त्रिया व दहा वर्षांच्या आतील बालक, गंभीर आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश नसेल.

श्री देवीजींना अर्पण करावयाच्या रोख व वस्तू स्वरुपातील देणगी स्वीकारण्याची सोय मंदिराचे धार्मिक कार्यालय, देणगी काऊंटरवर केले आहे.

श्री तुळजाभवानी देवीचे मंदिर पहाटे एक वाजता उघडण्यात येईल. चरणतीर्थ पूजेनंतर चार वाजेपर्यंत आधारकार्ड दाखवून शहरातील स्थानिक व्यक्तींना पास घेऊनच दर्शन मंडपातून दर्शनासाठी प्रवेश दिला जाईल.

पहाटे पाच ते रात्री नऊ अन्य भाविकांसाठी प्रवेश असेल.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here