म. टा. विशेष प्रतिनिधी

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून तान्हाजी या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित टाकण्यात आली असून यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही चित्रफित मी संभाजी भिडेंपासून भाजपच्या सगळ्या नेत्यांना पाठवली आहे व त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो आहे. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे आता काय प्रतिक्रिया देतात, ते मला पाहायचे आहे. त्यानंतरच आम्ही आमची प्रतिक्रिया देऊ. इतक्या जणांना ही चित्रफित पाठवल्यानंतरही कुणाचीही एका ओळीचीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या त्या सगळ्या संघटना आता कुठे गेल्या, असा खोचक सवालही राऊत यांनी याबाबत केला आहे.

पोलिटिकल किडा या ट्विटर हँडलवर ही चित्रफित टाकल्यानंतर त्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया टाकण्यात आल्या आहेत. ही चित्रफित तत्काळ मागे घ्यावी अन्यथा याचे परिणाम फार वाईट होतील, असे यातील शेकडो प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे.

ही चित्रफित भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केली गेलेली नाही. तसेच या चित्रफितीमध्ये कुठेही भाजपचे नाव नसले तरी केजरीवाल यांना उदयभान राठोड दाखवले असून नरेंद्र मोदी व अमित शहा हे कोंढाणा किल्ल्याप्रमाणे दिल्लीसाठी युद्ध करायला तयार असल्याचे दाखविण्यात आले आहे. शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे, असे संवादही यात घालण्यात आले आहेत. चित्रफितीच्या शेवची दिल्ली इलेक्शन २०२० असे इंग्रजीतील वाक्य असून भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा हे तनाजीच्या वेषात व त्याच्यासोबत ‘शहा जी’ अशी अक्षरेही या चित्रफितीत झळकतात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here