राज्यामध्ये करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन मध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. त्यानंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले होते. मात्र धार्मिक स्थळे उघडण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. दुसरीकडे धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, यासाठी भाजपसह विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत होते. त्यातच पाडव्यापासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आली, व आज सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानंतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे. मात्र आता धार्मिक स्थळे उघडण्यावरून श्रेय घेण्याचे प्रकारही सुरू झाले असून त्यावरूनच आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
वाचाः
‘धार्मिक स्थळं उघडल्याचं श्रेय भाजप पेढे वाटून घेत असल्याचं मला पत्रकारांनी सांगितलं. पण योग्य वेळी हा निर्णय घेणारं सरकार आणि करोनाला रोखण्यासाठी सहकार्य करणारी अध्यात्मिक-धार्मिक क्षेत्रातील मंडळी,भाविक व जनतेचा हा विजय आहे. भाजपने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करु नये,’ असा टोलाच पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
रोहित पवार यांनीही केली होती मागणी
राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत आमदार रोहित पवार यांनीही मागणी केली होती. त्याची देखील आठवण आज रोहित पवार यांनी करून दिली आहे. ‘राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यासाठी माझ्यासह इतरांनीही केलेल्या विनंतीनुसार आजपासून ती सुरु झाली आहेत,’ असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच रोहित पवार यांनी त्यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघातील विविध मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times