मंत्री जयंत पाटील हे आज नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा ही पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘मागील वर्षी २७ नोव्हेंबरला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली, त्याला लवकरच एक वर्ष पूर्ण होईल. बघता बघता सरकारचे एक वर्ष गेले. हे वर्ष कसे गेले, हे भाजपला सुद्धा कळाले नाही. आता सरकारची पुढील चार वर्षे कशी जातील, हे सुद्धा भाजपला कळणार नाही,’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
वाचा:
‘सरकार या एक वर्षात अनेक संकटांना सामोरे गेले. करोनाचे संकट सर्वात मोठे होते. राज्य सरकारने सर्व पद्धतीचा वापर करून करोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्यामुळे त्याचा महसुलावर परिणाम झाला. आता सगळे पुन्हा उभा करण्याचे काम हळूहळू गेल्या महिन्या-दोन महिन्यात सुरू झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर आले असल्यामुळे मला खात्री आहे, राज्य सरकारचे पुढच्या महिन्या-दोन महिन्यात उत्पन्न वाढेल. त्यानंतर राज्य सरकार अधिक गतीने काम करेल. शपथ घेतल्यानंतर करोना येईपर्यंत राज्य सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले. हा धाडसी निर्णयांचा सपाटा आगामी काळातही सुरू राहील,’ असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यात भाजपचा निभाव लागणार नाही
बिहार येथील निवडणुकीनंतर महाराष्ट्रात देखील सत्तांतर होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘बिहार राज्यात जी परिस्थिती होती, त्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांनी एकट्याने तेथील सत्तारूढ पक्षाला घाम फोडला होता. तेजस्वी यादव यांना आणखी साथ मिळाली असती तर त्यांचे सरकार तेथे आले असते. ते एकटे लढले, त्यामुळे काठावर अपयश आले. त्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. येथे तिन्ही पक्ष एकत्रित आहे. या तिन्ही पक्षांच्या पुढे भाजपचा निभाव लागणार नाही, हे भाजपला सुद्धा माहीत आहे.’
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times