नागपूर: ऐन दिवाळीच्या दिवसात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने हादरले. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजता कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. कुणाल सुरेश चरडे (वय २९,) आणि सुशील सुनील बावणे (वय २४, रा. दोघेही दिघोरी) अशी मृतकांची तर राहुल श्रावणजी लांबट (वय २७, रा. भांडेवाडी), निशांत प्रशांतराव शाहकर (वय २३, रा. शक्तीमातानगर) जागेश्वर संतोषराव दुधनकर (वय ३३, रा. निलेमलनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

सोमवारी सकाळी ७च्या दरम्यान मौजा डोंगरगाव परिसरात कुणाल आणि सुशील यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच कुही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंजाबराव परघणे आणि कुही पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू प्यायल्यानंतर क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हे हत्याकांड घडले आहे. कुणाल आणि सुशील हे दोघेही मजूर होते. जागेश्वरचा स्वत:चा जेसीबी आहे. त्याची या दोघांशी ओळख होती आणि काही जुने वादही होते, असे समोर आले आहे. रविवारी रात्री मृतक आणि आरोपी शहरातील दिघोरी परिसरात भेटले. पाचही जण एकत्र बसून दारू प्यायले. यानंतर हे पाचही जण एका गाडीत बसून डोंगरगावच्या दिशेने निघाले. गाडीत मृतक आणि जागेश्वर यांच्यातील जुन्या कारणावरील वाद उफाळून आला. मृतकांनी त्याला शिवीगाळ केली. आरोपी व मृतकांमध्ये चांगलीच वादावादी झाली. तिन्ही आरोपींनी गाडी थांबवून मृतकांवर तीक्ष्ण शस्त्रांनी तसेच सिमेंट काँक्रिटच्या खांबाने डोक्यावर, पाठीवर, पोटावर वार केले. यात या दोघांचा मृत्यू झाला. कुही पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला. अवघ्या सहा तासात पोलिसांना तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश आले.

आणखी वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here