मुंबई : जवळपास दीड महिन्यांपासून देशात इंधन दर स्थिर आहेत. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती ‘जैसे थे’च आहेत. आज मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग ४६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत. मुंबईत आज पेट्रोल ८७.७४ रुपये आणि डिझेल ७६.८६ रुपये प्रती लीटर कायम आहे. दरम्यान सीएनजी दरात मात्र महिनाभरापूर्वी एक रुपयाची कपात झाली. मुंबईत सीएनजीचा दर प्रती किलो ४७.९ रुपये झाला आहे. त्याआधी तो ४८.९ रुपये होता. त्यानंतर सीएनजी दरात देखील महिनाभरापासून कोणताही बदल झालेला नाही.

दिल्लीत आजचा पेट्रोलचा भाव ८१.०६ रुपये असून ७०.४६ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत पेट्रोल ८४.१४ रुपये असून डिझेल ७५.९५ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल ८२.५९ रुपये आहे. डिझेलचा भाव ७३.९९ रुपये प्रती लीटर झाले आहे. जवळपास ५६ दिवसांपूर्वी कंपन्यांनी पेट्रोल दरात बदल केला होता. तर ४६ दिवसांपूर्वी डिझेल दरात कपात केली होती.

दरम्यान, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होताना दिसली. मागील आठवड्यात युरोपात करोना व्हायरसची दुसरी लाट धडकली. त्यामुळे काही देशांनी पुन्हा लॉकडाउनची घोषणा केली. त्याचा तेलाच्या किमतींवर परिणाम दिसून आले. सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ४३.५ डॉलर प्रती बॅरल झाला. गेल्या आठवड्यात तेलाच्या भावाने ४५ डॉलरचा स्तर गाठला होता. त्यामुळे नजिकच्या काळात इंधन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल १६ सेंट्सने वधारला आणि ४३.९८ डॉलर झाला. करोना प्रतिबंधात्मक लशीच्या यशस्वी चाचणीने गुंतवणूकदारांमध्ये आशेचे किरण निर्माण झाला आहे. तेलाच्या किमतीतील घसरण रोखण्यासाठी तेल उत्पादक देशांची संघटना ओपेककडून उत्पादन कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेलाचा बाजार गरम झाला आहे. यूएस क्रूडच्या दरात १३ सेंट्सची वाढ झाली असून प्रती बॅरल दर ४१.४७ डॉलर झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here