म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात तालुक्यातील आपेगाव येथील पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री समोर आली आहे. अशोक सखाहरी औटे (वय ५०) व कृष्णा अशोक औटे (वय २२) असे हल्ल्यात मयत झालेल्या पिता पुत्राची नावे असून या घटनेमुळे गोदावरी नदी काठच्या गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

आपेगाव येथील शेतकरी अशोक औटे हे सोमवारी दुपारी त्यांच्या गावाजवळील शेतात गेले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत ते घरी न आल्याने, त्यांचा मुलगा कृष्णा औटे हा वडिलांना बघण्यासाठी शेतात गेला. रात्री आठ वाजेपर्यंत हे दोन्ही पितापुत्र घरी न आल्याने, गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता, त्यांना पिता अशोक औटे व मुलगा कृष्णा औटे या दोघांचे मृतदेह शेतात आढळले. मागच्या काही दिवसांपासून पाचोड व विहामांडवा परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्या निदर्शनास येत होता व छिन्हविछिन्ह अवस्थेत असलेले दोन्ही पितापुत्राचे मृतदेह बघितल्यावर, बिबट्याच्या हल्ल्यात या दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज गावकरी लावत आहे.

दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात आपेगाव येथील बापलेक ठार झाल्याची घटना समोर आल्यावर, तालुक्यातील नदी काठच्या गावांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली असून शेतकरी शेतात जायला घाबरत आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पितापुत्राचा मंगळवारी सकाळी शवविच्छेदन पैठण येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आले.

हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या आपेगाव येथील पितापुत्राचा कुटुंबियांना तात्काळ शासकीय मदत मिळावी या साठीची शासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व आपेगाव परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्याची कार्यवाही वन विभागाने सुरू केली आहे. सध्यातरी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात एकटे जाऊ नये, असं आवाहन पैठणमधील तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here