नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारतीय लष्कराशी केलेल्या दगा फटक्याची चीनला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. गलवान खोऱ्यातील घटनेनंतर भारताने चीनच्या मालाची कोंडी केली. त्यावर सीमाशुल्क वाढवले. तसेच भारतीय कंपन्यांना चीनमधून माळ खरेदी करण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे चीनला जबर आर्थिक फटका बसला आहे. केवळ भारतीय कंपन्याच नव्हे तर निम्म्याहून अधिक भारतीयांनी यंदा दिवाळीत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला.

दिवाळीत केलेल्या एका सर्वेक्षणानुसार ७१ टक्के भारतीयांनी चिनी वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार टाकला आहे. ‘मेड इन चायना’ वस्तूंना भारतीयांना यावेळी नकार दिला. मागील तीन महिन्यांपासून भारतीयांनी चिनी वस्तूंची खरेदी न करण्याचा निर्धार केला आणि तो पूर्ण केल्याचे या सर्व्हेत दिसून आले आहे.

समाज माध्यमांवर केलेल्या सर्वेक्षणात २०४ जिल्ह्यांमधील १४००० ग्राहकांनी आपल्या खरेदीबाबत मते मांडली. ज्यात ७१ टक्के ग्राहकांनी चिनी वस्तूंची खरेदी टाळली. तर केवळ २९ टक्के ग्राहकांनी एक किंवा दोन चिनी वस्तू खरेदी केल्या असल्याचे समोर आले आहे. त्या २९ टक्क्यांमधील ११ टक्के ग्राहक चीनबाबत अनिभिज्ञ होते. तर १६ टक्के ग्राहकांना माहिती असून देखील चिनी वस्तू खरेदी केल्याचे समोर आले आहे.

गेली २० वर्षे चिनी मालाची भारतीय बाजारपेठेवर पकड होती. विद्युत रोषणाई, स्मार्टफोन, शोभेच्या आणि सजावटीच्या वस्तू, खेळणी यासारख्या छोट्या आणि तुलनेने स्वस्त वस्तूंची भारतीय सणासुदीला जोरदार खरेदी करायचे. देशी मालाच्या तुलनेत स्वस्त असल्याने चिनी मालाला प्रचंड मागणी होती. यंदा मात्र ग्राहकांनीच पण केल्याने चिनी मालाची विक्री ठप्प झाल्याचे दिसून आले.

व्यावसायिकांची राष्ट्रीय पातळीवरील संघटना असलेल्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT) अंदाजानुसार भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याने चीनला किमान ४०००० कोटींचा फटका बसला आहे. व्यावसायिकांनी चीन मालाची आयात कमी करण्याचा निश्चय केला आहे. येत्या जानेवारीपासून याची कठोर अमलबजावणी केली जाणार असल्याचे संघटनेने म्हटलं आहे. या मोहिमेअंतर्गत डिसेंबर २०२१अखेर चिनी मालाची आयात १ लाख कोटींपर्यंत कमी करण्यात येणार आहे.

तब्बल ७२००० कोटींची विक्री
यंदाच्या दिवाळीतील विक्रीत १०.८ टक्के वाढ झाल्याचा दावा संघटनेने केले आहे. तब्बल ७२००० कोटींची विक्री झाली असल्याचे कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने म्हटलं आहे. गेले आठ महिने लॉकडाउनमुळे ग्राहकांनी खरेदी केली नव्हती. या काळात बचत केलेल्या पैशांवर सणासुदीत जोरदार खरेदी केली. जवळपास २० प्रमुख शहरांमधील व्यावसायिकांच्या विक्रीचा अंदाज घेण्यात आला. त्यानुसार विक्रीत १० टक्के वाढ झाल्याचे कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here