वाचा:
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी दिवाळी सणाच्या अनुषंगाने कोणाताही कायदा, सुव्यस्थेचा प्रश्न तसेच गर्दीच्या ठिकाणी चोरी होणार नाही, या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते. यावेळी काल, सोमवारी पहाटे पावणे दोन वाजण्याच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची ऑटो रिक्षा नगरच्या बाबा बंगाली परिसरात संशयास्पद रित्या फिरत असतांना पोलिसांना दिसून आली. रिक्षा थांबवून संबंधित रिक्षा चालकाकडे विचारपूस करीत असताना रिक्षा चालकाने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. त्यावेळी त्यास पकडून दोन पंचासमक्ष त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव फैरोज रफीक पठाण असे सांगितले. तसेच रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे ५६ लाख ८९ हजार ६९० रुपये किंमतीचे सोन्याचे १ किलो ३६८ ग्रॅम वजनाचे दागिने मिळून आले. रिक्षा चालकाकडे या दागिन्यांबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच दागिन्यांच्या मालकी हक्काबाबत त्याच्याकडे कोणतेही कागदपत्र आढळले नाहीत. त्यामुळे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून फैरोज रफीक पठाण याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, ही दागिन्याची बॅग नगरच्या गंजबाजार येथील परिसरात सापडली असल्याची माहिती त्याने दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times