बड्या कोर्पोरेट्सच्या तिमाही निकालांनी नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात जोरदार विक्री केली होती. यामुळे सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला होता. त्याचा दबाव आजही दिसून आला. ओएनजीसी, इन्फोसिस, इंडसइंड बँक, एनटीपीसी, एचयूएल या शेअरला मागणी आहे. तर टीसीएस, एसबीआय, टेक महिंद्रा, एलअँडटी, बजाज फायनान्स, टायटन, ऍक्सिस बँक, मारुती, पॉवरग्रीड,अशियन पेंट्स, टाटा स्टील, हिरोमोटोकॉर्प हे शेअर घसरले आहेत.
दावोस येथे आजपासून जागतिक आर्थिक परिषद सुरू होत असून यंदा तिचे ५०वे वर्ष आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने घसरत्या विकासदराकडे लक्ष वेधले आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर खाली आणतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सोमवारी मंदीचा फटका साऱ्या जगाला बसत असल्याचे अधोरेखित केले. त्याचवेळी भारतासारख्या अर्थव्यवस्था देत असलेल्या नकारात्मक धक्क्यामुळे मंदीचे सावट अधिकच प्रकर्षाने जाणवत असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे.
जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमधील वाढ कायम आहे. इराक, लिबियातील अस्थिरतेने मंगळावरी खनिज तेलाच्या किमतीत ११ सेंट्सची वाढ झाली. खनिज तेलाचा भाव ६५.३१ डॉलर प्रति बॅरलवर गेला आहे. खनिज तेलाच्या वाढत्या किमती भारतासाठी परवडणाऱ्या नाहीत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, जागतिक विकासदर चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०) २.९ टक्के राहील. २०२०-२१मध्ये हा विकासदर किंचित वाढून ३.३ टक्के तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात तो ३.४ टक्के होईल. ही घसरण नाणेनिधीने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये व्यक्त केलेल्या अंदाजांच्या तुलनेत आहे. नाणेनिधीच्या अंदाजाचे पडसाद आज बाजारावर उमटले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times