खंबाटकी घाट उतरत असताना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावानजीक पहिल्याच वळणावर ही दुर्घटना घडली. कारने ( क्र. एमएच ०६- एडब्ल्यू ६७५५ ) अचानक पेट घेतला आणि त्यात पूर्ण कारच खाक झाली. मुंबईहून वाईला ही कार चालली होती. घाट रस्त्यात उतारावरील एका वळणावर कार आली असता कारने पेट घेतला. इंजिन गरम होवून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार पेटल्याचे लक्षात आल्यावर गाडी चालकाने कार रस्त्याच्या एका बाजूस उभी केली व कारमधील दोन्ही व्यक्ती तत्काळ बाहेर पडल्या. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. हे दोघेजण मुंबईहून वाईला चालले होते.
कारची आग भडकल्यानंतर लगतच असलेल्या झाडालाही आग लागली व जवळच्या परिसरात आग पसरली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये काहीवेळ दहशत पसरली होती. वेळे गावातील लोकांनी तातडीने घटनास्थळी जात पोलिसांना पाचारण केले. तोपर्यंत घाटातील संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणली. नगरपालिकेचे अग्निशामक बंबदेखील घटनास्थळी दाखल झाला होता. या घटनेचा अधिक तपास भुईंज पोलीस करीत आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times