‘नासा’च्या केनेडी अवकाश केंद्रातून रविवारी रात्री या कॅप्सूलचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यानंतर २७ तासांचा प्रवास करून ही कॅप्सूल ‘आयएसएस’ या अवकाशात भ्रमण करणाऱ्या प्रयोगशाळेत दाखल झाली. अमेरिकेतील इदाहो प्रांतावर, अवकाशात ४२२ किमी अंतरावर ही कॅप्सूल ‘आयएसएस’ला जोडली गेली. या कॅप्सूलचे प्रमुख माइक हॉपकिन्स यांनी सर्वप्रथम अवकाश स्थानकाशी रेडिओद्वारे संपर्क साधला. तेव्हा ‘अरे वा, हा खूप चांगला आवाज ऐकायला मिळाला’, या उत्साही शब्दांत अवकाश स्थानकातील अंतराळवीर केट रुबिन्स यांनी त्यांना प्रतिसाद दिला.
वाचा:
उद्योगपती एलन मस्क यांच्या स्पेस-एक्स या व्यावसायिक कंपनीची अंतराळवीरांसह ही दुसरी अवकाश मोहीम आहे. मात्र अवकाश स्थानकावर सहा महिन्यांच्या मुक्कामासाठी अंतराळवीरांना पोहोचवण्याची कामगिरी स्पेस-एक्सने प्रथमच पार पाडली आहे. त्यामुळे या मोहिमेचे यश महत्त्वपूर्ण आहे. याआधी दोन अंतराळवीरांसह चाचणीसाठी हाती घेण्यात आलेली मोहीम दोन महिने कालावधीपुरती होती.
स्पेस-एक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून अवकाश स्थानकावर दाखल झालेल्या चार अंतराळवीरांमध्ये प्रमुख माइक हॉपकिन्स यांच्यासह व्हिक्टर ग्लोव्हर आणि शॅनोन वॉकर या तीन अमेरिकन, तर सोइची नोगुची या जपानी अंतराळवीराचा समावेश आहे. हे सर्व जण एप्रिलपर्यंत ‘आयएसएस’वर राहतील. त्यानंतर त्यांच्या जागी इतर अंतराळवीर दाखल होतील.
वाचा:
या चार अंतराळवीरांनी आपल्या कॅप्सूलला ‘रेझिलियन्स’ असे नाव दिले आहे. कॅप्सूलच्या अंतर्भागातील नियंत्रक कळी, साठ्याची जागा तसेच शून्य गुरुत्वाकर्षणाचे निदर्शक असलेले ‘बेबी योडा’ खेळणे यांचे दर्शन या अंतराळवीरांनी व्हिडीओद्वारे सोशल मीडियावर घडवले.
वाचा:
स्वस्त पर्याय
स्पेस-एक्सनंतर बोइंग ही कंपनीही अमेरिकेच्या ‘नासा’साठी अंतराळवीरांना अवकाश स्थानकापर्यंत नेण्या-आणण्याची मोहीम पार पाडणार आहे. ‘नासा’ आणि स्पेस-एक्स यांच्या ‘कमर्शियल क्रू प्रोग्रॅम’अंतर्गत सहा मोहिमांपैकी ही पहिली मोहीम आहे. अंतराळवीर आणि सामान यांची अवकाश स्थानकापर्यंतची वाहतूक कमी खर्चात करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आखला आहे. या दृष्टीने ही मोहीम अवकाश प्रवासातील नवीन युगाची सुरुवात मानली जाते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times