मुंबई : पायाभूत सेवा क्षेत्रातील (L & T) या समूहात तीन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे माजी संचालक यशंवत मोरेश्वर देवस्थळी (Y. M. Deosthalee Passed away ) यांचे आज मुंबईत निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी लीना देवस्थळी आणि दोन मुली दीपा व मीनल असा परिवार आहे.

देवस्थळी यांचे शिक्षण मुंबईत झाले. मुंबईतील सिडनहॅम कॉलेजात वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सीए (सनदी लेखापाल) आणि एल. एल बी (वकिलीचे शिक्षण) पूर्ण केले. देवस्थळी १९७४ मध्ये ‘एल अँड टी’मध्ये अकाउंट सुपरवायझर म्हणून सुरु झाले होते. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिले. एक एक पायरी चढत त्यांनी ‘एल अँड टी’ समूहाच्या मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) या पदापर्यंत मजल मारली. १९९० मध्ये ते महाव्यवस्थापक (Finance and Personal) बनले. १९९५ मध्ये त्यांना ‘एल अँड टी’ समूहाचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.

देवस्थळी ६ सप्टेंबर २०११ रोजी ‘एल अँड टी’मधून मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांनी ‘एल अँड टी फायनान्स होल्डींग’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली. देवस्थळी यांच्या नेतृत्वात एल अँड टी फायनान्स होल्डिंगने शेअर बाजारातून पैसे उभारला आणि बीएसई आणि एनएसईवर एल अँड टी फायनान्स होल्डिंगची नोंदणी झाली. २०१७ मध्ये देवस्थळी एल अँड टी फायनान्स होल्डींगमधून निवृत्त झाले. एल अँड टी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त होते.

निवृतीनंतर त्यांनी स्वता:ला समाजकार्यात वाहून घेतले होते. पत्नी लीनासह त्यांनी निराधार ज्येष्ठांची निवाऱ्याची सोय केली. खोपोली येथे त्यांनी चैतन्य जेष्ठ नागरिक सह निवास नावाची संस्था सुरु केली. ज्यात निराधार ज्येष्ठ नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध केल्या आहेत.

साधेपणा आणि स्नेहभाव
चांगला दिवाळीचा फराळ डोंबिवलीला मिळतो म्हणून खास प्रभादेवीवरून फराळ खरेदीसाठी देवस्थळी डोंबिवलीमध्ये जात असतं, अशी आठवण त्यांच्या परिचयातील एक व्यक्तीने सांगितली. देवस्थळी यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. स्पष्टवक्तेपणा, दूरदृष्टी, कमर्चाऱ्यांप्रती स्नेहभाव आणि साधेपणा यासारख्या गुणांमुळे देवस्थळी यांची कॉर्पोरेट जगतात वेगळी ओळख होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here