लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीज बिलात कुठलीही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत ऊर्जामंत्री यांनी काल, मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना दिले. त्यावरून मात्र राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. विरोधी पक्षाने त्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही राज्य सरकारला ‘वीज बिलात सवलत द्या, अन्यथा तुमची सुट्टी करायला नागरिकांना वेळ लागणार नाही,’ असा इशाराच दिला आहे.
‘अचानक करोनाचे संकट आल्यानंतर महाराष्ट्रात मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले. सात ते आठ महिने अनेक संकटांना नागरिकांना, सरकारला सामोरे जावे लागले,’ असे सांगतानाचा देसाई यांनी म्हंटले आहे की, ‘सरकारला जशा आर्थिक अडचणी आल्या, तशा नागरिकांना देखील अनेक आर्थिक अडचणी आहेत. त्यातच सात ते आठ महिन्यांचे वीज बिल सरकार भरायला सांगणार आहे. कुठलीही वीज बिलात सवलत देण्यास सरकार नकार देत आहे. असे निर्देयी सरकार नागरिकांनी बघितले नाही,’ असा घणाघातही देसाई यांनी केला आहे. ‘सरकारला वाढीव वीज बिलात सवलत द्यायची नव्हती तर त्यांनी आश्वासने का दिली ?,’ असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला आहे.
‘सध्या नागरिकांची अशी परिस्थिती आहे की ते सात-आठ महिन्यांचे वीज बिल भरू शकत नाही. वीज बिल भरायला सरकार सक्ती करीत असेल तर ज्यांच्याकडे वीज बिल भरण्यासाठी पैसे नाहीत, तेथे आत्महत्याच्या केसेस होऊन त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारवर येऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांना एवढचं आवाहन करायचे आहे की, त्यांनी वीज बिलात सर्वसामान्यांना सूट द्यावी. अन्यथा तुमची सुट्टी करायला सर्वसामान्यांना वेळ लागणार नाही,’ असंही त्या म्हणाले
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times