कराची : रोहित शर्माने आयपीएलमध्ये तब्बल पाच जेतेपदे मुंबई इंडियन्सला जिंकवून दिली आहेत. सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात ट्वेन्टी-२० क्रिकेटसाठी रोहितपेक्षा सरस कर्णधार शोधूनही सापडत नाही. त्यामुळेच भारतीय ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे द्यायला हवे, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले आहे.

शोएब पुढे म्हणाला की, ” सध्याच्या घडीला रोहित एक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे त्याचा विचार भारतीय संघाने ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार म्हणून करायला हवा. अन्य क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये विविध क्रिकेट संघांचे कर्णधार वेगवेगळे असल्याचे पाहायला मिळतात, भारतानेही तसेच करायला हवे. जेणेकरून विराट कोहलीवरचा भार हलका होण्यासाठी मदत होऊ शकेल.”

शोएब पुढे म्हणाला की, ” विराट कोहली हा २०१० सालापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. विराटने या कालावधीमध्ये ७० शतके झळकावत धावांचा डोंगर उभा केला आहे. पण गेली १० वर्षे तो सातत्याने हा भार सांभाळत आहे. आता तर भारताच्या तिन्ही संघांचे कर्णधारपद विराटकडेच आहे. त्यामुळे त्याच्यावर आता सर्वात जास्त भार असेल. त्यामुळे त्याच्यावरचा भार जर हलका करायला असेल तर भारतीय संघाने रोहितकडे ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद द्यायला हवे.”

आयपीएलमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत पाच जेतेपदे पटकावली आहेत. एकाही कर्णधाराला आतापर्यंत ही गोष्ट जमलेली नाही. रोहितकडे २०१३ साली मुंबई इंडियन्सच्या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. त्यानंतर गेल्या सात वर्षांमध्येच रोहितने आपल्या नेतृत्वाखाली संघाला तब्बल पाच जेतेपदे जिंकवून दिली आहेत. त्यामुळेच रोहित आता ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच भारतीय संघाचे कर्णधारपदही आता रोहितकडे द्यायला हवे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आता कोहलीकडून भारतीय ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद रोहितला कधी मिळणार, याची उत्सुकता जगभरातील चाहत्यांना नक्कीच असेल. पण यासाठी चाहत्यांना काही काळ प्रतिक्षा करावे लागू शकते, असे सध्याच्या घडीला तरी दिसत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here