नागपूर: रिंगरोडवरील आशीर्वादनगरमध्ये युवकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

उमेश ढोबळे (वय ३५, रा.सोमलवाडा), असे जखमीचे नाव असून त्याच्यावर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
उमेश हा फळभाजी विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी दुपारी उमेश व त्याचे दोन साथीदार एमएच- ३१- एफएल -०२५५ या क्रमांकाच्या मोपेडने आशीर्वाद नगरमधील बँक कॉलनी परिसरात आले. यादरम्यान उमेश याचा दोघांसोबत वाद झाला. दोघांपैकी एकाने देशी बनावटीच्या पिस्तूलातून उमेश याच्या डोक्याच्या दिशेने गोळी झाडली व दोघेही तेथून पसार झाले.

या हल्ल्यात उमेश जखमी झाला असून गोळीबाराच्या आवाजाने नागरिक जमले. एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी,उपायुक्त गजानन राजमाने, पोलिस उपायुक्त अक्षय शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रभारी) दिनकर ठोसरे, सक्करदरा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, बेलतरोडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

पोलिसांनी जखमीला मेडिकलमध्ये दाखल केले. मोपेडच्या क्रमांकावरून जखमीची ओळख पटली. उमेश हा बेशुद्ध आहे. तो शुद्धीवर आल्यानंतरच कोणी व कोणत्या कारणाने गोळीबार केला, याची माहिती मिळू शकले. उमेश याच्या भावाकडून संशयितांची माहिती घेण्यात येत आहे, अशी माहिती सक्करदरा पोलिसांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here