इशांतच्या स्नायूंना आयपीएल खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे यावर्षीच्या आयपीएलमध्ये इशांत हा दिल्ली कॅपिट्सकडून एकच सामना खेळला होता. त्यानंतर त्याने युएई सोडून भारतामध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इशांत हा बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर अकादमीचे संचालक आणि भारताचे माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली इशांतच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जात होते.
इशांत आता आपल्या या दुखापतीमधून सावरला आहे. त्याचबरोबर इशांत हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गोलंदाजीचा सरावही करत असल्याचे पुढे आले आहे. इशांतने अकादमीमध्ये पारस म्हाम्ब्रे आणि मन्सूर खान यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला आहे. यावेळी इशांतला फक्त एकच स्टम्प लावून सराव करायला सांगण्यात आले होते. जेणेकरून गोलंदाजी करताना त्याचे लक्ष केंद्रीत होऊ शकते.
इशांतबाबत गांगुली म्हणाले की, ” इशांतच्या दुखापतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. इशांत आता दुखापतीमधून सावरला आहे आणि त्याने सरावाला सुरुवातही केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याचा सराव सुरु आहे. त्यामुळे इशांतला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत आपण त्याला पाहण्याची शक्यता आहे. पण इशांत पूर्णपणे फिट झाल्यावर त्याला थेट भारतीय संघात प्रवेश मिळणार नाही. बीसीसीआयच्या नियमांनुसार फिट झाल्यावर इशांतला दोन स्थानिक सामने खेळावे लागतील. इशांत ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन दोन सराव सामने खेळू शकतो. त्यानंतर त्याचा विचार भारतीय कसोटी संघासाठी नक्कीच केला जाऊ शकतो.”
सध्याच्या घडीला इशांत सराव करत असून तो आता फिट झाल्याचे पाहायला मिळत आहे. इशांतचा फिटनेसमध्ये वाढ झाली आणि तो पूर्वीसारखा सराव करू लागला तर नक्कीच त्याला ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांमध्ये खेळता येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times