राज्यात एनडीए सरकार स्थापन होताच अवघ्या दोन दिवसांत भ्रष्टाचाराचे आरोप असलेले शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांच्यावरून मुख्यमंत्री वादात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नितीशकुमार हे मेवालाल यांना शिक्षणमंत्री पदावरून हटवण्याचा विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बुधवारी मंत्री मेवालाल चौधरी यांना बोलावून घेतलं. यानंतर मेवालाल हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीच काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाही. पण मेवालाल चौधरीसंदर्भात नितीशकुमार मोठा निर्णय घेऊ शकतात, असं दिसतंय.
२०१७ मध्ये मेवालाल चौधरी यांनी भागलपूरमधील सबौर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू असताना भरतीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कुलगुरू असताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने १६१ सहाय्यक प्राध्यापकांना पुन्हा नियुक्त केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.
त्यावेळी बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी मेवालाल चौधरी यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. मेवालाल चौधरी यांच्यावरील आरोप सत्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. सबौर कृषी विद्यापीठाच्या इमारतीच्या बांधकामातही घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी नवे शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांच्यावरून ट्विट करत मुख्यमंत्री नितीशकुमारांवर हल्ला केला. “तेजस्वीने मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत १० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिलं होतं. तर नितीशकुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळात घोटाळेबाज मेवालाल यांना मंत्री बनवून सरकारचे प्राधान्य दाखवून दिले, अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times