वाचा:
मुंबई पालिकेतील कारभारावर निशाणा साधतानाच फडणवीस यांनी मुंबईतील विविध प्रकल्पांवरूनही ठाकरे सरकारला लक्ष्य केले. सध्याच्या राज्य सरकारने प्रकल्पांना केवळ विरोध करण्यापलीकडे काहीच केले नाही. शेवटी प्रत्येक प्रकल्पात रोजगार मराठी माणसालाच मिळणार आहे. तरीही यांचे काम विकासविरोधी आहे आणि दुसरीकडे जनतेला विकास हवा आहे, असे नमूद करत मेट्रो कारशेडच्या बदललेल्या जागेवरून फडणवीस यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. केवळ अहंकारासाठी आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून चार वर्षे मुंबईकरांना मेट्रो मिळणार नसून जनतेच्या पैशाचा चुराडा करण्याचा हा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असा सवालच फडणवीस यांनी सरकारला केला. पूर्वी एक वाक्प्रचार होता, इच्छा तेथे मार्ग आता नवीन वाकप्रचार आला आहे आणि तो ‘टाइमपास तेथे कांजूरमार्ग’ असा आहे, असे म्हणत फडणवीस यांनी टोला लगावला. आमच्या सरकारच्या कार्यकाळात मुंबईचे सारे प्रकल्प मार्गी लागले. ट्रान्सहार्बर, कोस्टल रोड, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, रो-रो सेवा, बीडीडी चाळ व धारावी पुनर्विकास असे कितीतरी प्रकल्प त्यात सांगता येतील. सामान्य मराठी माणसाच्या हिताचे प्रकल्प आता मात्र थंड बस्त्यात गेले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
वाचा:
फडणवीस म्हणाले…
– बोलून सांगण्याचा विषय नाही. तो कृतीतून दाखविण्याचा विषय आहे.
– पोलिसांच्या बळावर हे आम्हाला दाबू शकणार नाही. जे काम स्वर्गीय इंदिरा गांधी यांना जमले नाही, ते तुम्हाला जमणार का? अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका. काल ओरडणारे विचारवंत आज गप्प का आहेत? सरकार बदलले की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदलते का?
– हे सरकार केवळ बदल्या आणि भ्रष्टाचार करण्यात मग्न होते. रोज यांना नावं ठेवायची आणि बोलघेवडेपणा करायचा. हे लोकांना आवडत नाही, अशांना लोकांची साथ कधी मिळत नाही.
– लोकांना २०० ते ३०० पटींनी अधिक वीज बिलं आली आहेत. सवलतीचा मोठा गवगवा केला गेला. मंत्रिमंडळात निर्णय घेतले. वारेमाप घोषणा झाल्या. आता म्हणतात बिल भरा! गरिबांसोबत मोठा विश्वासघात झाला आहे.
– देशातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण, देशातील सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात, मग करोना नियंत्रणात आणण्याचे श्रेय कसे घेता? आतापर्यंत टीका करायची नाही, हे ठरवून ठेवले होते. पण आता यांची लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही.
– काश्मीरमधील गुपकर आघाडीत काँग्रेस सहभागी आहे. याबाबत तुम्ही गुपकर आघाडीसोबत कसे जाता?, असा जाब संजय राऊतांनी काँग्रेसला विचारायला हवा पण, राऊत काँग्रेसला असे काही विचारणार नाहीत. त्यांना फक्त सत्तेत रस आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times