आयुर्वेदिक जडीबुटीची जाहिरात करणाऱ्या प्रख्यात वज्रदंती दंतपावडरचे नमुने सदोष आढळल्याने महाराष्ट्राच्या अन्न व औषध विभागाने (एफडीए) या कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. ही दंत पावडर ड्राय वेटच्या चाचणीमध्ये सदोष ठरली आहे. त्यामुळे प्रख्यात कंपनीच्या या उत्पादनावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सांगली विभागाने जुलै, २०२०मध्ये वज्रदंती या दंत पावडरच्या एन००४२ या बॅचमधील नमुने तपासणीसाठी घेतले. मे, २०१९मध्ये उत्पादित करण्यात आलेल्या या दंतपावडरची मुदत एप्रिल, २०२१ आहे. हे नमुने सांगलीहून मुंबईतील मुख्य कार्यालयातील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्रयोगशाळेमध्ये झालेल्या तपासणीचा अहवाल सप्टेंबर, २०२०मध्ये आला. या अहवालामध्ये या पावडरमध्ये ड्राय वेटचे प्रमाण हे निश्चित मानकाच्या तुलनेत फारच कमी असल्याचे आढळून आले. हे प्रमाण ७.५ ते ९ टक्क्यांपर्यंत असणे बंधनकारक आहे. मात्र ”च्या पावडरमध्ये हे प्रमाण ५.१२ टक्के इतके आढळले. हे प्रमाण योग्य नसल्यामुळे या उत्पादनाची गुणवत्ता वापरण्यायोग्य नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून सप्टेंबरमध्ये सांगली व नागपूर येथील एफडीए कार्यालयांना पाठवण्यात आला आहे. त्यानंतर या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. एफडीएच्या निर्देशानुसार या दंतपावडरचे उत्पादन मागे घेतले असून, संबधित कंपनीवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times