म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

वाहने, औद्योगिक क्षेत्र यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विचार करताना सर्वसाधारणपणे शहरी प्रदूषणाचा केला जातो. मात्र, प्रदूषणाची समस्या ही केवळ शहरांपुरती मर्यादित नाही. ग्रामीण भागांमध्येही प्रदूषणाची समस्या तितक्यात तीव्रतेने भेडसावत आहे. ग्रामीण भागांतील प्रदूषणासंदर्भात अधिक अभ्यास आणि त्याचे विश्लेषण होण्याची गरज आहे. कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटी आणि येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

देशातील शहरीकरण न झालेल्या भागांमध्ये देशातील ७० टक्के जनता राहते. ही लोकसंख्या देखील शहरी भागाइतक्याच प्रदूषणाची बळी ठरत आहे. कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटी आणि आयआयटी मुंबई येथील संशोधक देशभरातील प्रदूषणाचे विश्लेषण करत आहेत.

भारतामध्ये सुमारे १०.५ लाख लोकांचे मृत्यू हे हृदय किंवा फुप्फुसांच्या आजारामुळे कमी वयात होतात. पीएम २.५ या प्रदूषकाचा सामना करावा लागल्याने हे मृत्यू होतात. यातील ६९ टक्के मृत्यू हे शहरीकरण न झालेल्या भागातील आहेत, असेही यामध्ये उघड झाले आहे. प्रदूषणाचे स्रोत भिन्न असले, तरी पीएम २.५ या प्रदूषकामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये तेवढाच धोका आहे. नियंत्रणासंदर्भात आराखडा आखताना सर्वसाधारणपणे वाहने, उद्योग आणि कापणीनंतर उरलेले खुंट जाळल्याने निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष केंद्रित केले जात असले, तरी प्रदूषणाचे इतर स्रोतही तेवढेच महत्त्वाचे आहेत. यामध्ये वीटभट्टी, कचरा जाळणे, चुलीसाठी लागणारे जळण याचा समावेश आहे. यामुळे स्वच्छ हवा कार्यक्रमामध्ये या स्थानिक बाबींचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा आयआयटी मुंबईच्या प्रा. चंद्रा व्यंकटरमण यांनी व्यक्त केली.

भारतामध्ये प्रदूषणाची माहिती गोळा करण्यासाठी अपेक्षित यंत्रणा नसल्याने हवेच्या प्रदूषणाचा स्तर आणि विश्लेषण हे एक मोठे आव्हान असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागामध्ये प्रदूषणाची पातळी स्थानिकांसाठी तेवढीच घातक असली, तरी त्यावर उपाययोजना, त्यासाठीची आरोग्य यंत्रणा आणि त्यासाठी गरजेचा असलेला निधी याकडेही लक्ष दिले जात नाही. प्रदूषणाच्या या स्थानिक घटकांचा विचार झाला, तर भारतातील मोठ्या लोकसंख्येच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता येईल, असे यामुळे अधोरेखित झाल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

आधीच्या अभ्यासातील निष्कर्ष

– पीएम २.५ या प्रदूषकामुळे, तसेच ओझोनमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागांमध्ये शहरी भागांपेक्षा तिप्पट अधिक होते.

– उत्तर भारतामध्ये ग्रामीण भागांत लोकसंख्येचे प्रमाण खूप आहे. पंजाब ते पश्चिम बंगालपर्यंतच्या पट्ट्यात सर्वाधिक प्रदूषण नोंदले गेले आहे. या भागांमध्ये लोकसंख्याही अधिक आहे.

– शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये सर्वसाधारणपणे समान लोकसंख्येचे या पट्ट्यामध्ये विभाजन झालेले आढळते, असे संशोधकांना आढळून आले आहे.

– अमेरिका, युरोपप्रमाणे विकसनशील देशांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागांमधील लोकसंख्येमध्ये मोठा फरक आढळून येत नाही. तरीही आत्तापर्यंत केवळ शहरी भागातील प्रदूषणावरच लक्ष केंद्रीत करण्यात आले होते, असे कोलोरॅडो विद्यापीठाचे प्रा. ए. आर. रविशंकर यांनी स्पष्ट केले.

– भारतामध्ये ८० टक्क्यांहून अधिक नागरिक प्रदूषित हवेमध्ये श्वसन करत असल्याचेही या अभ्यासानुसार आढळून आले आहे.

– जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या निकषांच्यातुलनेत भारतातील स्वच्छ हवेची परिमाणे चौपटीने अधिक आहेत. त्यामुळे सगळेच भारतीय प्रदूषित हवेमध्ये जगतात, असेही यामध्ये समोर आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here