मुंबईत बुधवारी पार पडलेल्या पक्षाच्या कार्यकारिणीला मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी मुंबई महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याचा निर्धार बोलून दाखवला. ‘डोक्यात सत्ता गेली की पतन अटळ असते आणि मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ता बदलण्याची वेळ आता आली आहे,’ असं ते म्हणाले होते. संजय राऊत यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीसांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.
वाचा:
‘फडणवीस हे विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळं त्यांनी असं बोलणं हे त्यांच्या राजकारणासाठी सोयीचं आहे. राजकारणात कोणी वेगळी भूमिका घेतली म्हणून त्यांच्या अंगावर जाण्याची आमची परंपरा नाही. एका मर्यादेत कोणीही आपली भूमिका मांडू शकतो. मात्र, आमच्यासाठी शिवरायांचा भगवा हा एकच भगवा आहे. त्यामुळं मुंबईवर आता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकतोय तो शुद्ध आहे की फडणवीसांचा भगवा शुद्ध आहे याचा निर्णय मुंबईकर घेतील,’ असं राऊत म्हणाले.
‘मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. ती मिळवण्यासाठी १०६ हुतात्मे झाले आहेत. दिल्लीतून किंवा केंद्र सरकारकडून जेव्हा केव्हा मुंबईवर संकट आलंय, तेव्हा तेव्हा मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. त्यात शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर आहेत. शुद्ध भगवा फडकवण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी हा इतिहास चाळावा,’ असंही राऊत म्हणाले.
वाचा:
‘भाजपला मुंबई महाराष्ट्रात ठेवायची नाही. शिवसेना ते होऊ देत नाही हे त्यांचं दु:ख आहे. मुंबईवर ह्यांचं खरंच प्रेम असेल तर मुंबईला ओरबाडणाऱ्या, मुंबईबद्दल काहीही बोलणाऱ्यांबद्दल ह्यांनी कधी भूमिका घेतली आहे का?,’ असा सवालही राऊत यांनी केला. ‘गुजरातच्या एक माजी मुख्यमंत्री मुंबईत येऊन उद्योगपतींना चिथावणी देत होत्या. भाजपची कार्यकर्ती असलेली एक नटी मुंबई पोलिसांना माफिया म्हणत होती. मुंबईच्या जनतेविषयी उलटसुलट बोलत होती. मुंबईला पाकिस्तान बोलत होती. तेव्हा हे शुद्ध भगवावाले तिला पाठिंबा देत होते. अन्वय नाईक या मराठी माणसाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या एका टीव्ही मालकाला हे पाठिंबा देतात. हे तुमचं मराठीपण आहे का? तुमचा हा भेसळयुक्त भगवा मुंबईवर कधीच फडकणार नाही,’ असं ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times