अहमदाबादः गुजरातच्या अहमदाबादमधील ( ahmedabad ) करोनाच्या ( ) वाढत्या रुग्णांमध्ये गुजरात सरकार आणि अहमदाबाद महापालिकेने शहरात पुन्हा संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत शहरात संचारबंदी राहणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत शहरात आजपासून संचारबंदी लागू राहणार आहे.

या आदेशासोबतच सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याचे आवाहनही करण्यात आलं आहे. रात्रीच्या संचारबंदी दरम्यान फक्त आवश्यक वस्तूंची दुकानं खुली राहतील. याशिवाय अहमदाबादसाठी २० अतिरिक्त रुग्णवाहिका, ३०० डॉक्टर आणि ३०० वैद्यकीय विद्यार्थी नेमण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री विजय रुपानी सरकारने केलीय.

कोरोना रूग्णांच्या दृष्टीने अहमदाबादमधील ७ शासकीय रुग्णालये आणि ७६ खासगी कोविड रुग्णालयांसह एकूण ७२७९ बेड आहेत. यापैकी १५०० बेड सध्या रिक्त आहेत. यापैकी शासकीय रुग्णालयात १००० बेड रिकाम्या आहेत आणि खासगी रुग्णालयात ५०१ बेड आहेत. अहमदाबाद शहरात ९०० मोबाइल मेडिकल व्हॅन, ५५० संजीवनी रथ आणि १५० धन्वंतरी रथांच्या माध्यमातून नागरिकांना घरीच वैद्यकीय सुरक्षा पुरवली जात आहे, असं अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता म्हणाले.

दिवाळीमुळे बाजारांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नागरिक एकमेकांच्या घरी गेले. खरेदीसाठी घराबाहेर पडले. यामुळे करोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ झाली असून त्या दृष्टीने रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं गु्प्ता म्हणाले.

अहमदाबादमध्ये गेल्या ५ दिवसांत म्हणजे १४ नोव्हेंबरला १९८, १५ नोव्हेंबरला २०२, १६ नोव्हेंबरला २१०, १७ नोव्हेंबरला २१८ आणि १८ नोव्हेंबरला २०७ नवी रुग्ण आढळून आले आहेत.

गुजरातमध्ये दिवाळी संपल्यानंतर करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अहमदाबाद, सूरत, बडोदा आणि राजकोट यासारख्या शहरांमध्ये दिवाळीदरम्यान करोनाचे रुग्ण वाढल्याचं राज्य सरकारने मान्य केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here