अहमदनगर: ‘बिहार निवडणुकीतील भाजपच्या यशानंतर आपली जबाबदारी वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे. आता लवकरच महाराष्ट्रातही सत्तांतर होऊन राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल,’ असा आशावाद भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शिर्डीच्या नगरपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सध्या सुरू झाली आहे. त्यासाठी पक्षाच्या बैठका, मेळावे, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यांना वेग आला आहे. यानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. बिहारमधील पक्षाचे यशाचे उदाहरण देत त्यांनी स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना साद घातली.

विखे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या मंत्राने संपूर्ण देशाचा विश्वास संपादन केला आहे. बिहार निवडणुकीच्या यशानंतर सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेवून आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचवा. राज्यात लवकरच भाजपची सता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटिबद्ध व्हा,’ असे आवाहन विखे यांनी केले.

देशातील आणि राज्यातील स्थितीबद्दल ते म्हणाले, ‘बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे आहे. इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतून जनतेचे पाठबळ भाजपाच्या पाठीशी असल्याचे सिध्द झाले आहे. जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे आपण पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. करोना संकटाच्या काळात मोदींच्या नेतृत्वाकडे जगाचे लक्ष वेधले गेले. त्यांनी केलेल्या यशस्वी उपाय योजनांमुळे भारतात मृत्यूचा दर कमी राहिला.’

वाचा:

राज्य सकारवर टीका करताना ते म्हणाले, ‘राज्यातील सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. अनेक महिने घरात बसलेले मुख्यमंत्री राज्याने कधी पाहिले नव्हते. शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. समाजातील कोणत्याच घटकांना आघाडी सरकार दिलासा देऊ शकले नाही. महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेला सांगावे लागेल. थोड्याच दिवसात राज्यात भाजपची सता येईल.’

शिर्डी शहरातील भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांना नियक्ती पत्र विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, पक्षाच्या उद्योग आघाडीच्या उतर महाराष्ट्राचे प्रमुख शिवाजीराव गोंदकर, शहराचे अध्यक्ष सचिन शिंदे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन याप्रसंगी उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here