गौरी भिडे

गायक अमाल मलिकचं ” या नव्या गाण्याला तरूणांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. गाण्याचा हा नवा प्रयोग, रिअॅलिटी शोज, संगीत क्षेत्रातील स्पर्धा, घराणेशाही अशा विविध विषयांवर त्याच्याशी झालेल्या गप्पा…

० तुझ्या नव्या ‘तू मेरा नही’ या पॉप साँगबद्दल सांग.

‘तू मेरा नही’ या गाण्यातून माझं पॉप संगीतात पदार्पण झालं आहे. या गाण्याबद्दल सांगायचं, म्हणजे मी १५ वर्षांचा असताना ही धून मला सुचली होती. आत्ता ती लोकांसमोर आली आहे. या गाण्यात सगळंच छान जुळून आलं आहे. व्हिडीओमध्ये माझ्याबरोबर काम करणारी अभिनेत्री आदिती, आमचे दिग्दर्शक अरिफ खान या सगळ्यांनी त्यांची कामं चोख बजावली आहेत. रसिकांच्याही खूप सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे सुरुवात चांगली झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

० भारतात पॉप साँगचं प्रस्थ तितकंसं नाही. अशा परिस्थितीत प्रयोग करताना कोणती आव्हानं समोर होती?

हिंदी चित्रपटातली गाणी दिग्गज अभिनेत्यांवर चित्रित झाल्यानं जास्त लोकप्रिय होतात. पण, गेल्या काही वर्षांपासून अशा सिंगल्सचा वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. आता करोनामुळे चित्रपट येत नसल्यानं लोकांचं मनोरंजन करण्यासाठी ही चांगली वेळ होती. मी इतकी वर्ष ‘असं नाही, तसं नाही’ हे करत पदार्पणासाठी थांबलो होतो. मला वाटतं हीच योग्य वेळ होती. लोकांनी चांगल्या पद्धतीनं माझा स्वीकार केल्यानं विशेष अडचणी आल्या नाहीत. ज्या थोड्या-फार आल्या, त्यावर मात करत आम्ही चित्रीकरण, रेकॉर्डिंग पूर्ण केलं.

० तुझा आवाज रोमँटीक गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तुला कुठला जॉनर आवडतो ?

मी फक्त रोमँटीक गाणीच गातो असं नाही. पण, मी ‘रोमँटीक अॅट हार्ट’ असल्यानं ती गाणी माझ्या जास्त जवळची आहेत. माझ्या दृष्टीनं गाण्याचे शब्द आणि मेलडी महत्त्वाची असते. संगीत हा माझा श्वास असल्यानं, संगीताच्या सगळ्याच प्रकारात मुशाफिरी करायला मला आवडतं.

० लॉकडाउनच्या काळात अनेक कलाकारांनी त्यांचे सिंगल्स, अल्बम आणले, याबद्दल काय वाटतं?

संगीत ही संवाद साधण्यासाठी उत्तम भाषा आहे असं मला वाटतं. लॉकडाउनच्या नैराश्याच्या काळात सामान्य रसिकांचं ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे खूप चांगल्या प्रकारे मनोरंजन करण्यात आलं. संगीतामुळे सकारात्मक ऊर्जा मिळत असल्यानं, या काळात आपली कला सादर करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे मी आभार मानतो. जवळपास २०० ते ३०० नवी गाणी गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झाली, जी संगीतक्षेत्रासाठी खूप चांगली गोष्ट आहे.

० सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे म्युझिकमध्ये स्पर्धा वाढू लागली आहे का?

सोशल मीडियाच्या वापरामुळे की काय ते नेमकं सांगता येणार नाही. पण हो, सोशल मीडियाच्या वापरानं या क्षेत्रातली संख्या नक्कीच वाढली आहे. अनेक गोष्टी गाण्यावर अवलंबून असतात. सोशल मीडियावर केवळ लाइक्स, फॉलोअर्स मिळतात. या प्लॅटफॉर्मवरील गाण्यांच्या यशाची दोरी रसिकांच्या हातात असते. गाण्यात दम नसेल, गायकानं चांगलं गायलं नसेल, तर ते गाणं चालत नाही. पण कलाकार आणि रसिकांचा थेट संबंध वाढवण्यासाठी सोशल मीडिया हे चांगलं माध्यम ठरू शकतं.

० रिअॅलिटी शोजमुळे खरं टॅलेंट पुढे येतं का?

कलाक्षेत्रात नाव मिळवण्यापेक्षा ते टिकवणं ही अवघड गोष्ट आहे. यासाठी सातत्य आणि मेहनत या दोन गुणांची गरज कायम भासते. हरण्याची भीती असेल, तर त्या कलाकाराचं अशा रिअ‍ॅलिटी शोजमध्ये कठीण आहे. दररोज काहीतरी वेगळं या क्षेत्रात घडत असतं. अनेक गुणी, चांगले गायक अशा रिअ‍ॅलिटी शोजमधूनच आपल्याला मिळाले आहेत. पण, शो संपल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करायची आहे हे अनेक जण विसरतात आणि तिथेच चूक होते. स्ट्रगल कुणालाच चुकत नाही.

० सध्या वेब सीरिजच्या म्युझिकचीही चर्चा होते. त्यासाठी प्रयोग करावासा वाटत नाही का?

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मची खूप चर्चा आहे. तिथेही चांगल्या संधी उपलब्ध आहेत. एका वेब सीरिजसाठी संगीत दिग्दर्शक म्हणून मी काम केलं आहे. मला आवडेल आणि तेवढी चांगली संधी असेल तर मला या माध्यमात अजून काम करायला नक्कीच आवडेल.

० घराणेशाहीविषयी तुझं मत काय आहे ?

चांगल्या आणि गुणी कलाकाराला संधी मिळत असेल, तर त्यात काही गैर नाही. पण, केवळ आई-वडीलांचं, नातेवाइकांचं नाव आहे आणि स्वत:मध्ये प्रतिभा नाही, अशा व्यक्तीला जर दुसऱ्या कुणा गुणवंताच्या हातचं काम दिलं जाणार असेल, तर ते चुकीचं आहे. आमचं आडनाव मलिक असूनही आम्हीही दिग्दर्शक, निर्माते यांना अनेक वेळा जाऊन भेटलो आहे. त्यामुळे या क्षेत्रात मेहनतीला पर्याय नाही.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here