बीड: साईबाबांच्या जन्मभूमीवरून आणि पाथरीच्या ग्रामस्थांमध्ये सुरू झालेला वाद मिटत नाही तोच, साईबाबा हे बीडमध्ये काही वर्षे नोकरी करत होते, असा दावा बीडमधील साईभक्तांनी केला आहे. ही साईबाबांची कर्मभूमी आहे. सरकारने या कर्मभूमीतील तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

साईबाबांचा जन्म पाथरीमध्ये झाल्याचा दावा तेथील ग्रामस्थांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना, पाथरीच्या विकासासाठी आराखडा तयार असल्याचं सांगितलं होतं. यावरून शिर्डीतील ग्रामस्थांनी बंद पाळला होता. हा वाद मिटत नाही, तोच साईबाबा हे सर्वप्रथम धुपखेडा येथे प्रगट झाले असल्याचा दावा पैठण तालुक्यातील धुपखेड्यातील गावकऱ्यांनी केला होता. सरकारनं धुपखेड्याला साईबाबा यांची प्रगट भूमी जाहीर करून गावात येणाऱ्या साईभक्तासाठी निधी देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. आता यात बीडवासियांची भर पडली आहे. साईबाबा हे काही वर्षे बीडमध्ये वास्तव्यास होते. पाथरीहून शिर्डीला जात असताना ते चार ते पाच वर्षे बीडमध्ये राहिले. तिथे त्यांनी नोकरीही केली. त्यामुळं बीड ही त्यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी सरकारनं १०० कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.

साईबाबा हे बीडमध्ये वास्तव्यास असल्याचा उल्लेख साईचरित्रात आहे. साईबाबा बीडमधील हातमागाच्या दुकानात नोकरीला होते, चार ते पाच वर्षे ते बीडमध्ये राहिले होते. त्यांचं काम पाहून त्यावेळच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी भेट म्हणून एक पगडी भेट दिली होती, असं आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी आम्हाला सांगितलं होतं, असं बीडमधील साईभक्त पाटणकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. तर किर्तनकार भरतभाऊ रामदासी म्हणाले की, ”साईबाबा हे संत, फकीर होते. ते एकाजागी कधीच थांबत नव्हते. ते बीडमध्येही आले होते. दासगणू महाराजांच्या ग्रंथात तसा उल्लेख आहे. साईबाबा हे त्यांचे गुरू केशवराज बाबासाहेब महाराज यांना सेलू येथे भेटले होते. तेथे त्यांनी अध्यात्मिक शिक्षण घेतले होते आणि त्यानंतर ते शिर्डीला गेले होते.” मी ब्राह्मण कुळात जन्माला आलो आणि माझा जन्म हा पाथरीत झाला आहे, असं साईबाबांनी म्हाळसापतींना सांगितल्याचा उल्लेख आहे. पाथरीत जन्म झाला ही वस्तूस्थिती आहे, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, साईबाबांची कर्मभूमी ही बीड आहे. पाथरीच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला तर, बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी देण्यात यावा, अशी मागणी येथील साईभक्तांनी केली आहे.

‘साईबाबा धुपखेडा येथे प्रगटले’

दरम्यान, साईबाबा हे सर्वप्रथम धुपखेडा येथे प्रगट झाले असल्याचा दावा येथील गावकऱ्यांनी केला आहे. सरकारनं धुपखेड्याला साईबाबा यांची प्रगट भूमी जाहीर करून गावात येणाऱ्या साईभक्तासाठी निधी देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. पैठणपासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या धुपखेडा गावात साईबाबा यांचे मोठे मंदिर असून, दररोज शेकडो साईभक्त मंदिराला भेट देतात. गावकऱ्यांनुसार, जवळपास दीडशे वर्षांपूर्वी साईबाबा यांचे धुपखेडा या गावात अडीच ते तीन वर्षे वास्तव्य होते. धुपखेड्याचे रहिवाशी असलेले माजी आमदार संजय वाघचौरे म्हणाले, ‘जवळपास दीडशे वर्षांपूर्वी, धुपखेड्याचे पोलीस पाटील चांद पटेल यांचा घोडा हरवला होता. घोड्याचा शोध घेत असताना चांद पटेल यांची साईबाबा यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळी, साईबाबा यांनी चांद पटेल यांचा घोडा शोधून दिला व त्यांना काही चमत्कार दाखवले. त्यानंतर चांद पटेल यांनी साईबाबा यांना धुपखेड्यात आणले. साईबाबा हे शांत व संयमी असल्याने चांद पटेल यांनीच साईबाबा यांना ‘साई’ असे नाव दिले. चांद पटेल यांच्या बहिणीच्या लग्नाला साईबाबा शिर्डी येथे गेले व ते शिर्डीतच राहिले. आजही चांद पटेल यांचे वंशज धुपखेड्यातच राहतात व शिर्डी येथे त्यांचे नातेवाईक राहतात.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here