मुंबईत नाइट लाइफ सुरू करणार, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असमर्थता व्यक्त केली होती. ‘मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे’, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. आता या नाइट लाइफच्या प्रस्तावावर भाजप नेते राज पुरोहित यांनी वक्तव्य केलं आहे. मुंबईतील नाइट लाइफ तरुणांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. त्यामुळं बलात्काराच्या घटना वाढतील आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खात्यात आवश्यक मनुष्यबळ नाही, असं ते म्हणाले.
गेल्या पाच वर्षांपासून आम्ही नाइट लाइफला विरोध करत आहोत. नाइटलाइफ युवकांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. यामुळं बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होईल. महिलांवरील अत्याचारात वाढ होईल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची संख्या तितकी नाही, अशी भीती पुरोहित यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रस्तावाला भाजपनंही विरोध केला होता. नाइट लाइफमुळं मुंबईकरांची शांतता भंग होईल, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले होते. ‘निवासी भागात लेडीज बार, पब चोवीस तास तास सुरू ठेवण्यास भाजपचा विरोध राहील’, असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे नाइट लाइफच्या संकल्पनेचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समर्थन केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times