म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत भाजपचे ‘’ महाराष्ट्रात शक्य होणार नाही, आमदार फुटलाच तर त्याचं डिपॉजिट जप्त होईल, त्यामुळं महाविकास आघाडीचे हे सरकार पंधरा नव्हे पंचवीस वर्षे टिकेल, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला, तर करोना काळातही भाजपचे नेते राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यामध्ये उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम ठेवण्यासाठी शिवसेना सोबत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही कायम सोबत ठेवा, असा टोला मारला. त्यानंतर मुश्रीफांनी हाच धागा पकडत टोलेबाजी केली.

‘भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे आता पदवीधरांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन देत आहेत. बारा वर्षे ते पदवीधरांचे प्रतिनिधी होते, राज्यात दोन नंबरचे मंत्री होते, तेव्हा त्यांना कुणी अडवले होते का ? बारा वर्षे काही काम केलं नाही, आता ऑपरेशन कमळ च्या बाता मारत आहेत. त्यासाठी शिवसेनेला हिंदूत्व आणि इतर मुद्यावरून डिवचत आहेत. पण त्यांचा प्रयत्न राज्यात यशस्वी होणार नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी भाजपला लगावला आहे.

‘खोटं बोलून भाजपने आपली दुकानदारी सुरू ठेवली आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरला वाऱ्यावर सोडून पुणे गाठले. या निवडणुकीच्या प्रचारात ते थापा मारत आहेत. मात्र, सेनेकडून कोणतीही दगाबाजी होणार नाही. आज ज्या पध्दतीने व्यासपीठावर महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र आहेत, त्याप्रमाणे पुढील पंधरा वर्षे हे व्यासपीठ असेच दिसावे. यासाठी काँग्रेसला सोबत ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे.’ अशी प्रतिक्रिया
उच्च शिक्षणमंत्री सामंत यांनी दिली आहे.

‘सहा वर्षात पदवीधरांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढले आहेत. ज्यांनी प्रश्न वाढवले, ते मैदान सोडून पळून गेले आहेत. पुण्यातही त्यांनी जे काही केलं आहे, त्यामुळे पुण्याहून मला काळजी करू नका असे फोन येत आहेत. यावरून काय होणार हे कळेलच. कारण चंद्रकांत पाटील जिथे जातात, तिथे विरोधी पक्षाचा फायदा होतो. या निवडणुकीत तो होणारच आहे,’ असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

प्रारंभी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी स्वागत तर भरत रसाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार पी.एन. पाटील, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, अरूण दुधवडकर, आसगावकर, लाड यांची भाषणे झाली. आर.के. पोवार यांनी आभार मानले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here