म.टा. प्रतिनिधी, नगर: करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात आलेले प्रशासक राज आता संपुष्टात येणार आहे. मुदत संपलेल्या राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार डिसेंबरमध्ये मतदार याद्यांचे काम पूर्ण झाल्यावर जानेवारी-फेब्रुवारीत प्रत्यक्ष निवडणूक होऊ शकणार आहे.

यावर्षीच्या एप्रिल ते जून या काळात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका करोनामुळे होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे तेथे प्रशासक नियुक्त करण्याची वेळ आली. प्रशासक नियुक्त करतानाही सरकारने कायद्यात बदल करून आपल्या मर्जीतील लोकांची तेथे वर्णी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकरण हायकोर्टात गेले. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे सरकारला नवा निर्णय गुंडाळून ठेवून प्रशासक म्हणून सरकारी अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करावी लागली. त्यामुळे गावातील कार्यकर्ते नाराज झाले होते.

तेव्हापासूनच लवकर निवडणुका व्हाव्यात, अशी अपेक्षा इच्छुकांकडून व्यक्त केली जात होती. आता राज्य निवडणूक आयोगाने यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. एक डिसेंबरला प्रभागनिहाय प्रारुप मतदारयादी जाहीर केली जाईल. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी २५ सप्टेंबर २०२० पर्यंत तयार केलेली मतदार यादी आधार धरण्यात येईल. त्यावर सात डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर १० डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. मतदारयादी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनेही करण्यात येणार आहे.

नंतर नियमानुसार प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. त्यामुळे नव्या वर्षात ग्रामपंचायतींवरील प्रशासकराज संपुष्टात येऊन लोकांनी निवडून दिलेले सदस्य म्हणून काम पाहू लागतील. त्यामुळे आता ग्रामीण भागातील राजकारणाची रणधुमाळी सुरू होणार आहे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठीही निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या बदलानुसार सरपंच गावकऱ्यांच्या मतदानातून नव्हे तर सदस्यांमधून निवडण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here