कार्तिकी यात्रेला पंढरपुरात संचारबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वारकरी समाज आक्रमक झाले असून वारीला वारकरी येणार नसतील तर शासकीय महापुजेला उपमुख्यमंत्री कशाला, असा आक्षेप वारकरी संघटनांनी घेतला आहे. तसंच, कार्तिकी यात्रेवर निर्बंध घातल्यास वारकरी संप्रदाय येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, असाही इशारा दिला आहे. या प्रकरणावरच अमोल मिटकरी यांनी भाष्य केलं आहे.
‘उपमुख्यमंत्र्यांच्या कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल महापुजेला विरोध करणारे वारकरी नसून संघाचे चमचे आहेत. वारकऱ्यांच्या नावाखाली विठ्ठल पुजेला विरोध करणाऱ्या या भाजपा कंपनीपासून वारकऱ्यांनी सावध असावे,’ अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच, तुका म्हणे खळ, करु समयी निर्मळ, या अभंगातील काही ओळीही लिहित भाजपला चिमटा काढला आहे.
दरम्यान, वारकरी समन्वय समितीच्या बैठकीत सरकारविरोधात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. ‘प्रत्येक वेळेला शासनाला सहकार्य करूनही वारकरी संप्रदयावर कायम अन्याय होत असेल तर आता संप्रदाय शांत राहणार नाही, अशी भूमिका राणा महाराज वासकर यांनी सांगितले. या पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत वारकरी संप्रदाय गावोगावी जाऊन विठ्ठल भक्तांना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करेल, असेही वासकर यांनी सांगितलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times