म. टा. प्रतिनिधी, सांगली: सांगली महापालिकेच्या वीज बिलांमध्ये परस्पर फेरफार करून महापालिकेला लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षभरातील वीज बिलांमधून प्रत्यक्ष वापरापेक्षा ३१ लाख ८३ हजार रुपयांची जादा रक्कम उकळण्यात आली. याबाबत वीज बिलांचा भरणा करून घेणारे वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था, एम. डी. पवार पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक आणि ज्ञानेश्वर सदाशिव पाटील (वय २९, रा. दत्त चौक, सांगलीवाडी) या तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. महापालिकेतील अधिकारी अमरसिंह वसंतराव चव्हाण (४८, रा. मिरज) यांनी फिर्याद दिली.

सांगली शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेची कार्यालये आणि शहरातील पथदिव्यांची वीज बिले शहरातील वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था आणि एम. डी. पवार पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेत भरली जातात. विजेच्या वापरानुसार प्रत्यक्षात आलेले आणि भरणा केलेल्या रकमेत फरक असल्याचा संशय काही सामाजिक संस्थांनी व्यक्त केला होता. नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी वीज बिलामध्ये झाल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केली होती. यानुसार आयुक्त नितीन कापडणीस यांनी वीज बिलांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत वीज बिलांमध्ये फेरफार करून महापालिकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मे २०१९ ते जून २०२० या कालावधीत महावितरणने दिलेल्या वीज बिलांतील रकमेपेक्षा ३१ लाख ८३ हजार ५१० रुपये अतिरिक्त वसूल केले आहेत. वसंतराव चौगुले नागरी सहकारी पतसंस्था, एम. डी. पवार पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेतील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह ज्ञानेश्वर सदाशिव पाटील यांनी संगनमताने हा अपहार केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. महावितरणने दिलेल्या बिलांमध्ये संशयितांनी फेरफार केला. वाढवलेल्या रकमेचे धनादेश महापालिकेकडून घेऊन ते वीज बिल भरणा केंद्रांमध्ये वटवले. यात महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सामाजिक संस्थांनी यापूर्वी केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने अन्य विभागातही संगनमताने अपहार झाले आहेत काय, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here