म. टा. प्रतिनिधी, : दिवाळीपूर्वी बाजारपेठेत झालेल्या गर्दीचे परिणाम वाढणा-या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येवर दिसत आहेत. दिवाळीनंतर सांगलीत नव्या रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात ३०१ नव्या रुग्णांची भर पडली, तर उपचारादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे २८ पर्यंत खाली आलेला दैनंदिन रुग्ण वाढीचा आकडा ८० पर्यंत जाऊन पोहोचला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांसह आरोग्य यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून हळूहळू कमी होत आलेला करोना संसर्ग पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. जुलै ते सप्टेंबर महिन्यात सांगली जिल्ह्यात रोज सरासरी ७०० ते ८०० रुग्ण आढळत होते. झपाट्याने वाढलेल्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण आला होता. अनेक रुग्णांनी व्हेंटिलेटरअभावी प्राण गमावले, तर रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने अनेकांना घरातच उपचार घ्यावे लागले. पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात होत्या. मात्र, दिवाळीपूर्वी बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी करोनाच्या दुसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरण्याची भीती या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

सांगलीत १६ नोव्हेंबरला नव्या २८ रुग्णांची नोंद झाली होती. यापूर्वी सलग दोन दिवस २९ रुग्णांची नोंद झाली. त्यापूर्वी रोज ५० ते ७० च्या दरम्यान रुग्णसंख्या वाढत होती. १७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात पुन्हा रुग्णांच्या संख्येत वाढ सुरू झाली. गेल्या दोन दिवसात दीडशे रुग्ण वाढले. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ४२२ एवढी झाली आहे, तर १६८८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ४०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

वाचा:

शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू असतानाच रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी एका कार्यक्रमातून याबाबत चिंता व्यक्त केली. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनीच दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here