दिवाळीनंतर करोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात अद्याप करोनाची दुसरी लाट आलेली नसली तरी दिल्ली, अहमदाबाद आणि सूरत यासारख्या मोठ्या शहरांत करोनाचा परत उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकार सतर्क झालं आहे. आरोग्य यंत्रणांना वेळीच सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दुसरी लाट आलीच तर ती परतवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अपेक्षेनुसार मुख्यमंत्र्यांनी अन्य विषय टाळून फक्त करोनावर फोकस करत जनतेला आवाहन केलं. आपल्या मोजक्याच संबोधनात मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यातील जनतेला पुढील धोक्यापासून सावध करण्याचेच काम केले.
करोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी असू शकते. अन्य ठिकाणची स्थिती पाहिल्यानंतर त्याचा आताच अंदाज येत आहे. त्यामुळे जो संयम आणि शिस्त तुम्ही आजवर दाखवली आहे तसाच संयम तुम्हाला यापुढे दाखवायचा आहे. आपल्या हातात सध्या खबरदारी घेण्यापलीकडे काहीच नाही. लस अद्याप आलेली नाही. त्याबाबत निश्चित कुणीच काही सांगत नाही. लस आली तरी पुढची प्रक्रिया मोठी आहे. लगेचच राज्यातील साडेबारा कोटी लोकांना लस देता येणार नाही. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता तुम्हाला अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे. मास्क घालणे, हात धूत राहणे, अंतर राखणे हीच त्रिसुत्री आपल्याला यापुढेही पाळावी लागणार आहे. आपण आज एका नाजूक वळणावर आहोत असेच तुम्ही समजा. या वळणावरून आपल्याला सहीसलामत पुढे जायचे आहे. करोनाचे आकडे जे कमी झाले आहेत ते पुन्हा वाढू द्यायचे नाहीत. देशातील काही शहरांत रात्रीचा कर्फ्यू लावण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. तसे आपल्याला काही करायचे नाही. लॉकडाऊनही आपल्याला परवडणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर तुमची साथ महत्त्वाची आहे. कृपा करून गर्दी टाळा. जे नियम ठरवले आहेत ते पाळा. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. गर्दी झाली तर करोना मरणार नाही तर वाढणार आहे, हे पक्के ध्यानात असू द्या, अशी कळकळीची विनंती आणि आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times