नवी दिल्लीः देशातील करोना रूग्णांची एकूण संख्या ९१ लाखांवर ( ) गेली आहे. आतापर्यंत ९१ लाख २९ हजार ३ नागरिकांना करोना संसर्ग झाला आहे. यापैकी ८५ लाख ५० हजार ९३१ नागरिक करोनातून बरे झाले आहेत, ही दिलासादायक बाब आहे. सध्या ४ लाख ४२ हजार ४२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर करोना संसर्गामुळे आतापर्यंत देशात १ लाख ३३ हजार ५९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी गेल्या २४ तासांत ३३ हजार ९५ इतके नवीन करोना रुग्ण आढळले. तर ३० हजार ८९२ जण करोनामुक्त झाले आणि ३२७ जणांना मृत्यू झाला.

यादरम्यान, करोना लस लवकरात लवकर नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने वेगात तयारी सुरू केली आहे. करोनावरील लशीच्या आपत्कालीन वापराबाबत ( ) केंद्र सरकार विचार करत आहे. याचाच अर्थ क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यानंतर सर्व काही ठीक राहिल्यास सरकार या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

आपत्कालीन वापरासाठी नियम बनवण्यात येतील

केंद्र सरकारने करोनासंदर्भात नेमलेल्या टीमची गेल्या दोन दिवसांपासून बैठक सुरू आहे. या बैठकीत लशीची किंमत, खरेदी, लसीकरण प्रक्रिया, साठवण इत्यादी विषयांवर चर्चा झाली. यात निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) विनोद पॉल, सरकारचे मुख्य शास्त्रज्ञ सल्लागार के. विजय राघवन आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांचा सहभाग होता. लशीच्या आपत्कालीन वापराबद्दलही या बैठकीत चर्चा करण्यात आली. लशीचा आपत्कालीन वापर करण्यास परवानगी देण्यासाठी काही नियम बनवण्यात येतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ८ राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकामागून एक दोन बैठका घेतील. करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते आधी चर्चा करतील. दुसर्‍या बैठकीत मुख्यमंत्री किंवा अन्य राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींशी चर्चा होईल. या बैठकांमध्ये पंतप्रधान मोदी हे लस वितरण प्रक्रिया आणि करोनाची दुसरी लाट रोखण्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करतील, असं सूत्रांनी सांगितल्याचं वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

राज्यांमध्ये केंद्राचे आरोग्य पथक रवाना

केंद्र सरकारने करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात आरोग्य पथकं रवाना केली आहेत. या राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. केंद्र सरकारने यापूर्वी हरयाणा, राजस्थान, गुजरात आणि मणिपूरमध्ये आरोग्य पथकं रवाना केली आहेत. तसंच दिल्ली, महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांमध्ये करोनाचे पुन्हा वेगाने वाढत आहेत. छत्तीसगडलाही केंद्राचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here