म. टा. वृत्तसेवा,

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नवी मुंबई महापालिकेतर्फे विविध ठिकाणी उभारण्यात आली आहेत. महत्त्वाच्या ठिकाणी तर अत्याधुनिक व स्वयंचलित उभारून पालिकेने आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी या सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली आहे. त्यातच स्वयंचलित ई-टॉयलेट आधीपासून वादात सापडलेली असताना वाशी पामबीच मार्गावर असलेले एक ई-टॉयलेट चक्क गायब झाले आहे. हे टॉयलेट चोरीला गेल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

महापालिकेने २००० पासून शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या व्यवस्थेकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. यानुसार शहरातील जुनी शौचालये पाडून नवी सार्वजनिक शौचालये उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची संख्या दीड हजारांच्या घरात आहे. यात महिला पुरुष आणि लहान मुलांसाठीही विशेष शौचालये उभारण्यात आली आहेत. ही सार्वजनिक शौचालये पालिकेने काही संस्थांना चालवण्यास दिली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना पैसे आकारून ती वापरता येतात. यासाठी प्रत्येकी २ रुपये आकारले जातात.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग घेताना महापालिकेने शहराचा कायापालट करण्याचे ठरवले तेव्हा शहरातील शौचालयांकडे विशेष लक्ष दिले. त्यानुसार अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवली. काही ठिकाणी तर फिरती शौचालयेही उभी करण्यास सुरुवात झाली. काही मोजक्या ठिकाणी ई-टॉयलेट बांधून पालिकेने आधुनिकपणा दाखवला. आज या ई-टॉयलेटची संख्या २२ झाली आहे. या शौचालयात ५ रुपयांचे नाणे टाकल्यावर ते उघडते. मात्र त्याच्या वापराबाबत अनेकांचा गोंधळ उडाल्याने ते सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. या टॉयलेटमध्ये एकदा एक व्यक्ती अडकल्याने त्यातील सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पामबीच मार्गावर असलेले एक ई-टॉयलेट गायब झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी परिमंडळ उपायुक्तांकडे बोट दाखवले. तर परिमंडळ एकच्या उपायुक्तांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. गायब झालेले हे शौचालय चोरीला गेले असून त्याची तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याकडून मिळाली.

२४ तास खुली ठेवण्याची मागणी

सार्वजनिक ठिकाणी शौचास जाणाऱ्यांवर पालिकेचे मॉर्निग पथक थेट दंडात्मक कारवाई करते. सार्वजनिक शौचालये रात्री कुलूपबंद केली जातात. रात्री कोणी त्याचा विनामूल्य वापर करू नये यासाठी रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जवळजवळ सर्वच ठिकाणची शौचालये बंद असतात. यातून ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि महिलांची कुचंबणा होते. त्यामुळे पालिकेने ही शौचालये २४ तास खुली ठेवावीत, अशी मागणीही होत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here