म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: रिक्षाचे पैसे देण्यावरून चार जणांनी मिळून एका तरुणाचे केले. तरुणाला धमकावून त्याच्या क्रेडिट कार्डवरून दारू खरेदी केली. त्यानंतर अपहरण केलेल्या तरुणाच्या भावाकडे २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) संध्याकाळी पाच ते शनिवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी बारा वाजताच्या कालावधीत शहर परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक केली आहे.

सिकंदर उर्फ महंमद रफिक इस्माइल नदाफ (३२, रा. वल्लभनगर, पिंपरी. मूळ रा. निगडी), कुमार पांडागळे (३२, रा. दळवीनगर, निगडी), अमित गायकवाड (२५, रा. संत तुकारामनगर, पिंपरी), प्रमोद उर्फ पप्पू फुलपगारे (३४, रा. गांधीनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मनीषकुमार भगत (२४, रा. नाणेकरवाडी, ता. खेड. मूळ रा. झारखंड) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याबाबत शनिवारी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषकुमार नाणेकरवाडी येथे डिप्लोमा इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतो. त्यांचा मित्र अनिल गोरे रिक्षा चालवतो. अनिल आणि आरोपी यांचे रिक्षाच्या पैशांवरून वाद सुरू आहेत. त्यातून आरोपी शुक्रवारी दुपारी मनीषकुमार याच्या खोलीवर आले. त्यांनी अनिलबाबत चौकशी केली. त्यानंतर आरोपींनी मनीषकुमारला जबरदस्तीने रिक्षात बसवून मारहाण करून वल्लभनगर येथे नेले. वल्लभनगर-पिंपरी येथे मनीषकुमार यांचे पैशांचे पाकीट आणि मोबाइल फोन आरोपींनी काढून घेतला. मनीषकुमार यांना त्यांच्या क्रेडिट कार्डचा पिन क्रमांक जबरदस्तीने विचारून क्रेडिट कार्डद्वारे आरोपींनी दारू खरेदी केली. त्यानंतर मनीषकुमारचा भाऊ अभिषेक भगत यांना फोन करून २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. ‘पैसे दिले, तरच मनीषकुमारला सोडतो,’ अशी धमकी आरोपींनी मनीषकुमारच्या भावाला दिली.

पोलिसांना माहितीच नाही

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्याचे अपहरण करून रिक्षातून त्याला शहरात फिरविले जाते. त्याच्या कार्डवरून दारू खरेदी करून त्याला डांबून ठेवले जाते; परंतु याची पुसटशी कल्पनाही शहरातील कोणत्याही पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्याला नव्हती. शनिवारी सकाळी मनीषकुमारच्या नातेवाइकांनी शहरातील प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींद्वारे पोलिसांशी संपर्क साधल्यावर या प्रकरणाची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर तांत्रिक सहायकाच्या मदतीने आरोपींना पकडून मनीषकुमारची सुटका करण्यात आली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here