म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: अमर रहे, अमर रहे, अमर रहे, भारत माता की जय च्या जयघोषात आणि शोकाकूल वातावरणात वीरपूत्र संग्राम पाटील याच्यावर त्याच्या निगवे खालसा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला अखेरची मानवंदना देण्यासाठी परिसरातील हजारो ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांसाठी एक कोटीची मदत देण्याची घोषणा पालकमंत्री यांनी केली.

शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात दोन दिवसापूर्वी जम्मू येथील राजौरी येथे संग्राम पाटील यास वीरमरण आले होते. त्यापूर्वी गेल्या आठवड्यातच आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान ऋषीकेश जोंधळे हा हुतात्मा झाला होता. त्याच्यावर गेल्या सोमवारी दिवाळी दिवशीच बहिरेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आठ दिवसात आज सोमवारी वीरपूत्रावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली.

सकाळी संग्रामचा पार्थिव कोल्हापुरात आणण्यात आला. करवीर तालुक्यातील निगवे खालसा या गावातील शाळेत त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली होती. ग्रामस्थांनी चौथरा बांधून तो फुलांनी सजवला होता. पार्थिव गावात येताच त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. अमर रहे, अमर रहे, संग्राम पाटील अमर रहे अशा जयघोषात ग्रामस्थांनी या वीरसूपूत्रास मानवंदना दिली. अतिशय शोकाकूल वातावरणात, साश्रूपूर्ण नयनांनी आणि हजारो लोकांच्या उपस्थितीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे वडिल, आई आणि पत्नीने फोडलेल्या हंबरड्यामुळे अनेकांना हुंदका आवरता आला नाही. संग्रामला दोन लहान मुले आहेत. या मुलांना पाहून अनेकांना गहिवरून आले.

वीरपूत्र संग्राम याच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अनेकांनी मानवंदना दिली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, प्रकाश आबिटकर, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक शैलेश बलकव आदि उपस्थित होते.

आठ दिवसापूर्वी हुतात्मा झालेल्या ऋषीकेश जोंधळे व संग्राम पाटील या दोन्ही वीरपूत्रांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी एक कोटी रूपये मदत देण्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. संग्रामच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पालकमंत्री पाटील यांनी तर त्याचे अपुरे घर पूर्ण करून देण्याची जबाबदारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here