मुंबई: दिल्लीसह अनेक राज्यात करोनाची दुसरी लाट आली आहे. दिल्लीतील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक होत चालली आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे.

राज्यात दिवाळीनंतर करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दिवाळीनंतर करोना रुग्णांचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळं राज्य सरकारने वेळीच पावलं उचलत महाराष्ट्र – प्रवासावर निर्बंध आणले आहेत. महाराष्ट्राच्या सीमांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहेत. तसंच, दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून ट्रेन किंवा विमानानं येणाऱ्या प्रवाशांकडे करोनाचे चाचणीचे अहवाल असणं अनिवार्य असणार आहे. प्रवाशांनी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीत रेल्वे, विमान आणि रस्ते प्रवासासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार, राजस्थान, दिल्ली, गोवा आणि गुजरात या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी जवळ आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल जवळ बाळगावा. मात्र, हा अहवाल ७२ तासांमध्ये करण्यात आला असावा, असंही या नियमावलीत नमूद केलं आहे. जर, प्रवाशांकडे करोना चाचणीचा अहवाल नसेल तर, विमानतळावर व रेल्वे स्थानकांवर अँटीजन टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या अँटीजन टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरंच, प्रवाशांना विमानतळा बाहेर किंवा रेल्वे स्थानकाबाहेर जाता येणार आहे. अन्यथा, प्रवाशांना त्यांच्या राज्यात पुन्हा परतावे लागणार आहे.

राजस्थान, गोवा, दिल्ली आणि गुजरात या चार राज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना जवळच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. तसंच, रस्ते मार्गानं प्रवासी येत असल्यास राज्याच्या सर्व सीमांवर या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. प्रवाशांमध्ये करोनाची लक्षण आढळली तर त्यांना राज्याच्या सीमेवरुनच परत पाठवलं जाणार आहे. तसंच, प्रवाशांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसतील तरच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. असंही या आदेशात नमूद केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here