दिल्लीत करोनाचा उद्रेक झाला आहे. राजधानी दिल्लीत करोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या राज्यातून महाराष्ट्रात यायचं असल्यास करोना चाचणी सक्तीची असणार आहे. २५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. याविषयी राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे.
हवाई मार्गाने प्रवास करत असल्यास हे आहेत नियम
>> दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोवा या चार राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल जवळ बाळगणं बंधनकारक आहे. प्रवाशांचे हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास या प्रवाशांना राज्यात परवानगी देण्यात येणार आहे.
>> आरटी- पीसीआर चाचणी महाराष्ट्रात दाखल होण्याआधी ७२ तास आधी करावी लागणार आहे
>> प्रवाशांकडे आरटी- पीसीआर चाचण्याचे अहवाल नसल्यास या प्रवाशांना स्वखर्चाने करोना चाचणी करावी लागणार आहे. यासाठी विमानतळावर करोना सेंटर्स उभारण्याची सोय करण्यात येणार आहे.
>> चाचणीनंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानी देण्यात येईल, मात्र, त्याआधी त्या प्रवाशाचा फोन क्रमांक, पत्तासह सर्व माहिती घेण्यात येईल.
>> जर संबंधित व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांच्यांशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.
रेल्वे प्रवासासाठी नियमावली
>> महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल जवळ बाळगणं बंधनकारक आहे
>> प्रवासी रेल्वे मार्गानं महाराष्ट्रात येत असतील तर त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट मागील ९६ तासांमध्ये केलेली असली पाहिजे
>> आरटी- पीसीआर टेस्टचे रिपोर्ट नसल्यास त्या प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकांवर स्क्रिनिंग होणार आहे.
>> प्रवाशांना करोनाची लक्षण असल्यास त्यांना घरी जाता येणार आहे.
>> रेल्वे स्थानकांवर करोनाची लक्षण आढळल्यास तिथेच अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे. अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच प्रवाशांना घरी जाता येणार आहे.
>> प्रवाशांची अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तसंच, कोविड सेंटरचा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे
रस्ते मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी नियम
>> दिल्ली, राजस्थान, गोवा, गुजरातहून रस्ते मार्गानं येणाऱ्या प्रवाशांचं राज्याच्या सर्व सीमांवर स्क्रिनिंग होणार आहे.
>> प्रवाशांमध्ये कोणतीही लक्षण आढळल्यास त्यांना राज्याच्या सीमेवरुनच माघारी परतावं लागणार आहे. लक्षणं नसल्यास त्या प्रवाशांना राज्यात येता येणार आहे.
>> ज्यांना लक्षण आहेत अशा प्रवाशांची अँटीजन टेस्टचा पर्यायही सरकारने दिला आहे. अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना पुढील प्रवास करता येणार आहे.
>> प्रवाशांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांना जवळच्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. कोविड सेंटरचा खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times