वाचा:
भाजपच्या वतीने आज ठिकठिकाणी वीज बिलांची होळी करीत आंदोलन करण्यात आले. नगरमध्ये जिल्हा भाजपचे आंदोलन माजी मंत्री शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनानंतर बोलताना कर्डिले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. ‘जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांचा धिक्कार केला पाहिजे. ते राज्यपातळीचे राज्यकर्ते असताना केवळ कोल्हापूरचे मंत्री असल्यासारखे वावरत आहेत. ते जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून एक किंवा दोन वेळा येतात व दोन नंबरच्या धंदे करणाऱ्यांचे डबे खाण्याचे काम करतात. पालकमंत्र्यांनी ज्या दोन नंबरवाल्यांचे डबे खाले, तेच आज जेलमध्ये दिसत आहेत,’ असे कर्डिले म्हणाले. मुश्रीफ येथे येतात आणि वसुली घेऊन जातात, यापेक्षा दुसरे काहीही करीत नाहीत, असा आरोपही कर्डिले यांनी केला.
वाचा
‘राज्यातील सरकारने एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला बहुमताने जनतेने सत्ता दिली नाही. या पक्षांनी ओढूनताणून सत्ता मिळवली आहे. त्यामुळे त्यांनी लोकांची जिरवायची ठरवले आहे. जिल्ह्यामध्ये तीन मंत्री असून हे तिन्ही मंत्री निष्क्रीय ठरले आहेत,’ अशी घणाघाती टीकाही यावेळी त्यांनी केली.
वाचा:
दरम्यान, कर्डिले यांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यामध्ये २२ ऑक्टोबर नंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ आले नाहीत. त्यामुळे आता ते नगरला केव्हा येणार व कर्डिले यांना काय उत्तर देणार, याकडे नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times