म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या केंद्रांची विभागणी करताना गोंधळ झाला असल्याने निदर्शनास आले आहे. शिक्षक असलेल्या मतदारांसाठी एकाच केंद्रावर मतदान करण्याची व्यवस्था करण्याऐवजी अनेकांना दोन वेगवेगळी केंद्र देण्यात आहेत; तसेच काही मतदारांना घरापासून किमान १६ किलोमीटरच्या परिसरातील मतदान केंद्र दिले असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिक्षक असलेल्या मतदारांची नावे ही पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदार संघांमध्ये आहेत. अशा मतदारांची मतदानाची व्यवस्था ही एकाच केंद्रावर करणे अपेक्षित आहे. मात्र, निवडणूक शाखेकडून केंद्रांची विभागणी करताना गोंधळ झाला आहे. शिक्षक असलेल्या अनेक मतदारांना दोन वेगवेगळी केंद्र देण्यात आली असल्याचे काही मतदारांनी सांगितले.
मतदारांना घराजवळील मतदान केंद्र देणे आवश्यक आहे. मात्र, मतदारांसाठी केंद्र देताना किमान १६ किलोमीटर अंतरावरील कोणतेही केंद्र देण्याचे निश्चित करून निवडणूक शाखेने केंद्रांचे वाटप केले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना घरापासून दूर अंतरावरील केंद्र आली आहेत. याचा परिणाम हा मतदानाच्या टक्केवारीवर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या मतदार संघांसाठी यापूर्वी १२०० मतदारांसाठी एक मतदान केंद्र असायचे. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ५०० ते ७०० मतदारांसाठी एक केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यानुसार पदवीधर मतदार संघात ५८९ मतदारांसाठी एक आणि संघासाठी २५८ मतदारांमागे एक मतदान केंद्र आहे. विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२०२ मतदान केंद्र असून, पदवीधर मतदार संघामध्ये ८३५ आणि शिक्षक मतदार संघात ३६७ मतदान केंद्र झाली आहेत. मात्र, केंद्रांची विभागणी करताना मतदारांना दूरवरची आणि दोन वेगवेगळी केंद्र आली आहेत.

‘बोगस मतदारांविरूद्ध गुन्हे दाखल करा’

‘करोनाच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदान होऊ नये, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी. बोगस मतदार असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरूद्ध ताबडतोब गुन्हे दाखल करा’ असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रशासनाला दिले आहेत. राव यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पाचही जिल्ह्यांच्या निवडणूकविषयक कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करून सॅनिटायझर पुरविण्याची व्यवस्था करावी. निवडणुकीत ऐनवेळी काम वाढण्याची शक्यता गृहीत धरून अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करावे’ अशाही सूचना त्यांनी केल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here